Home Blog Page 1079

तरंगवाडी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रकिया राबविण्यात येत असून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वीच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी शिक्षण पूर्णपणे मोफत असून प्रत्येक वर्गनिहाय ४० जागा आरक्षित आहेत. निवासी शाळेत एकूण विद्यार्थी संख्येची मर्यादा २०० असून अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रर्वग २ टक्के आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत.

प्रवेशासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका, विद्यार्थ्यांचे व पालकांची चार रंगीत छायाचित्रे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

शाळेत डिजिटल अध्यापन सुविधा, सायन्स पार्क, सेमी इंग्रजी माध्यम, मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व सुसज्ज इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा, संगणक लॅब, मोफत निर्वाहाचे साहित्य, ई ग्रंथालय आदी सोयी सुविधा असून दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा मेळावा व सहलीचे आयोजन करण्यात येते.

अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक- ९९६०६४९६१६, वसतिगृह अधीक्षक भ्रमणध्वनी क्रमांक ९९६००२३५८०, सहायक शिक्षक – ९५०३१२८५७०, ९६६५८६९६२९, ८४५९४१२६२८, ९१५८४४३८१७ व ९६०४५९३६२१ या क्रमांकावर इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहनही शाळेचे मुख्याद्यापक एन.जी. मणेरी यांनी केले आहे.

संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा रोखठोक इशारा

पुणे (प्रतिनिधी)

देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेली असून, संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केले. देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा, म्हणजे मुस्लिमांचा आहे, असा दावा २००६ मध्येच तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केला होता. आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरीबांकडील संपत्ती हिरावून घेतली जाईल, असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.

राजस्थानमधील बसवारा येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा हा कट उघड केल्यामुळे काँग्रेस आता भयभीत झाली असून त्यांनी थटथयाट सुरू केला आहे. मात्र, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच देशातील दलित, मागासवर्गीय, ओबीसी समाज विकासापासून वंचित राहिला असून केवळ अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने या समाजाची कायम उपेक्षा केली आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला. याउलट, देशाच्या विकासाची फळे समाजाच्या प्रत्येक स्तरावरील अखेरच्या व्यक्तिपर्यंत पोहोचली पाहिजेत, सरकारच्या प्रत्येक योजनेचा संपूर्ण लाभ खऱ्या लाभार्थीला मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला सक्षमतेच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत, यावर मोदी सरकारने नेहमीच भर दिला आहे. अंत्योदयाच्या संकल्पनेवर भारतीय जनता पार्टीची श्रद्धा असून अंत्योदयाच्या नीतीवरच पक्षाची वाटचाल सुरू असल्याने मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत आखलेल्या प्रत्येक योजनेचे लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहेत, असा दावाही उपाध्ये यांनी केला.

गरीबांच्याही संपत्तीवर डोळा असलेली व संपत्ती काढून घेऊन अन्य समाजात तिचे वाटप करण्याचा कट आखणारी काँग्रेस व प्रत्येक समाजघटकास संपत्ती निर्माण करण्याच्या संधी देणारी भाजप असा हा सामना आहे, असेही ते म्हणाले. मुस्लिमांचे लांगूलचालन करून निवडणुका जिंकण्याचे काँग्रेसचे राजकारण १९६० च्या दशकापासून सुरू आहे, आणि भाजप सातत्याने याविरुद्ध संघर्ष करत आहे. एका बाजूला तुष्टीकरणाचे राजकारण आणि दुसरीकडे मोदी सरकारचे विकासाचे राजकारण यांतील या संघर्षात देशातील जनतेने कायमच विकासाच्या राजकारणास साथ दिल्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची सातत्याने हार होत असल्याने आता जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, असा आरोपही त्यांनी केला. लोकांकडील अतिरिक्त संपत्ती काढून घेण्याची ही मूळ विचारसरणी माओवादी-नक्षलवाद्यांची असून काँग्रेस आता ती प्रत्यक्षात आणू पाहात आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या २०२४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात असे स्पष्टपणे नमूद आहे की, देशातील जाती, उपजातींच्या सामाजिक, आर्थिक स्थितीची गणना करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रम राबविला जाणार असून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर पुढील कार्यवाहीचा दिशा मजबूत केली जाईल, असे काँग्रेसच्या २०२४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. या देशात बहुसंख्यवादाला थारा नाही, असेही काँग्रेसने म्हटले असून अल्पसंख्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक लाभ, सार्वजनिक रोजगार, कौशल्य विकास, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांत अधिक संधी देण्याची हमी काँग्रेसने दिली आहे. मागासवर्गीय जातीजमातींसाठी असलेल्या आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादा हटवून ती वाढविली जाईल. अल्पसंख्यांकांना अधिकाधिक लाभ मिळविण्याचीच ही योजना असून संपत्ती व उत्पन्नातील असमानता दूर करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनामुळेदेखील अतिरिक्त संपत्तीधारकांची संपत्ती अल्पसंख्याकांकडे वळविण्याचा छुपा हेतू उघड झाला आहे, असे ते म्हणाले.

देशाचा एक्स रे करून वित्तीय संस्थांचे सर्वेक्षण करण्याचा व देशातील संपत्तीचे स्रोत शोधण्याचा काँग्रेसचा इरादा राहुल गांधी यांनी ५ एप्रिल रोजी जाहीरनामा जारी करतानाच उघड केला होता, मात्र, त्याचे कथानक फार पूर्वीच लिहिले गेले आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे हे शोधून काढण्याची मोहीम हाती घेण्याचे १६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्रात बोलतानाही राहुल गांधी यांनी जाहीर केले होते, तर ६ एप्रिल २०२४ रोजी तेलंगणात बोलताना, ‘जिसकी जितनी आबादी, उतना उसका हक’ असे जाहीर करून त्यांनी संपत्तीच्या वितरणाचा कट उघडही केला आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. गरीब, मागासवर्गीयांची कमाई, महिलांची बचत काढून घेऊन त्यातील मोठा वाटा अल्पसंख्याकांच्या ताटात घालण्याचा काँग्रेसचा इरादा यातूनच स्पष्ट झाला आहे, असे ते म्हणाले.

याआधी, १९६३ व १९७४ मध्ये जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने तर, ‘कम्पल्सरी डिपॉझिट स्कीम कायदा’ या गोंडस नावाखाली लोकांची संपत्ती जप्त करण्यासंबंधीचे कायदेच संमत केले होते, व त्यामुळे आपल्या कमाईचा १८ टक्के हिस्सा सरकारजमा करणे सरकारी कर्मचारी व संपत्तीधारकांना भाग पडत होते. ही संपत्ती तीन ते पाच वर्षे सरकारी तिजोरीत गोळा केली जात होती, व विशेष म्हणजे, देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे असे म्हणणारे डॉ. मनमोहन सिंह हेच तेव्हा सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते, याकडेही उपाध्ये यांनी लक्ष वेधले.

अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्यासाठी साधनसंपत्ती त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची डॉ. मनमोहन सिंह यांची ही भूमिकाही अचानक जन्माला आली नव्हती. अनुसूचित जातींच्या यादीत मुस्लिमांचा समावेश करणे, सरकारी नोकऱ्यांत मुस्लिमांना १५ टक्के आरक्षण ठेवणे, धर्माच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून मुस्लिमांकरिता सहा टक्के रक्षण ठेवणे व धर्मांतरानंतरही अनुसूचित जातींचा दर्जा कायम ठेवणे असे अनेक प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते असा दावादेखील श्री. उपाध्ये यांनी केला. डॉ. मनमोहन सिंह यांच्या या वक्तव्याच्या काही दिवस अगोदर सच्चर समितीचा अहवाल आला आणि मुस्लिमांची स्थिती दलितांहूनही बिकट असल्याचा दावा त्यामध्ये केला गेला, हा काही निव्वळ योगायोग म्हणता येईल का, असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसला देशातीलसामाजिक व्यवस्थेची वीण नष्ट करायची असून केवळ मते मिळवून सत्तेचे लोणी ओरपण्यासाठी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे राजकारण करायचे आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच अशा राजकारणाविरोधात संघर्ष केला असून आता देशातील जनता काँग्रेसचा हा कट उधळून लावेल, असा विश्वासही श्री. उपाध्ये यांनी या पत्रकार परिषदेत शेवटी व्यक्त केला.

फ्रेमबॉक्सच्या विद्यार्थ्यांनी साकारले विविध चित्रपट आणि गेमिंगचे सेट्स..

फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे आर्ट शोकेस प्रदर्शन

पुणे, प्रतिनिधी – ऍनिमल चित्रपटातील मशीनगन, ओपनहाइमर चित्रपटातील अणुस्फोट, हनुमान चित्रपटातील भव्य सेटचा अनुभव पुणेकरांनी घेतला. कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी फ्रेमबॉक्सने आयोजित केलेल्या वार्षिक कला प्रदर्शनातून मिळाली. ग्राफिक्स, गेमिंग, ऍनिमेशन, व्हिज्वल इफेक्ट्स विभागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेल्या कामांचा आढावा या स्टुडन्ट आर्ट शोकेस मधून घेण्यात येतो. फर्ग्युसन कॉलेज रोड येथील फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे आर्ट शोकेस प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन फिक्कीचे संचालक आशिष कुलकर्णी, फ्रेमबॉक्स २.० चे संस्थापक व संचालक राजेश तुराखिया, उपाध्यक्षा विनिता बचानी यावेळी उपस्थित होत्या.

विनिता बचानी म्हणाल्या की, कोणताही सिनेमा, जाहिरात किंवा गेमिंग तेंव्हाच पसंत केली जाते जेंव्हा त्यामध्ये विविध सेटची भव्यता, लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आणि सिनेमॅटिक दृश्य अतिशय कल्पकतेने केलेली असतात. हे सर्व साकारताना मेहनत, सातत्य आणि कलाकारांची कसोटी पणाला लागते. बाहुबली, ब्रम्हास्त्र सारख्या भारतीय चित्रपटातील या स्पेशल इफेक्ट्सने हॉलिवूडच्या तंत्रज्ञांनी मागे सारले आहे. लहानपणापासून आपण सर्वच जण विविध गेम्स टीव्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून खेळत आलो आहोत. याच गेमिंगचा उपयोग करून भविष्यात अनेकजण नोकरी मिळवू शकतात. भारतातील किंबहुना जगभरात असलेल्या या क्षेत्रातील संधी काय आहेत या संबंधी या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली.

आशिष कुलकर्णी म्हणाले, अॅनिमेशन, व्हीएफएक्स साकारताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला आहे. यासाठी कथाकथन आणि ललित कले बरोबर तंत्रज्ञानाचा वापर खुबीने केलेला दिसून येतो. या सर्व कलांचा अनुभव घेत असताना विद्यार्थ्यांनी निरीक्षण, विचार, कल्पना, अनुभव, प्रयोग, निर्मिती आणि पुनःनिर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली. फ्रेमबॉक्सच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया अतिशय मजबूत केला आहे. तंत्रज्ञान आणि नवीन घडामोडींसह अद्ययावत राहण्याचा सल्ला कुलकर्णी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

राजेश तुराखिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती या वार्षिक कला प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या गेल्या ज्यामुळे पालकांसह या क्षेत्रातील दिग्गजांना याचा आनंद घेता आला. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री मार्केट लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षामध्ये देशातील गेमिंग इंडस्ट्रीसह इतर AVC म्हणजेच अॅनिमेशन, व्हीएफएक्स, कॉमिक्स या सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वेट ट्रेनिंगपासून ते डाएटपर्यंत राशी खन्नाने ‘अरनमानाई 4’ मधल्या गाण्यासाठी अशी केली खास मेहनत

अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्री राशि खन्ना हिने तिच्या आगामी तमिळ चित्रपट ‘अरनमनाई 4’ मधील ‘अचाचो’ गाण्यात तिच्या लुकसह सगळ्यांचं लक्ष वेधून ” योद्धा ” फेम अभिनेत्रीने या गाण्यासाठी खास मेहनत देखील घेतली आहे. टोन्ड बॉडी करण्यासाठी राशी ने खास डाएट देखील फॉलो केल्याचं कळतंय. 
 फिटनेसचा कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो यावर जोर देऊन राशी म्हणाली ” मी या गाण्यासाठी खास कष्ट घेतेले आहेत. 12 ते 16 तासांच्या शूटिंगच्या दिवसातही मी माझ्या वर्कआउटसाठी वेळ काढते. रोज नियमित व्यायाम करून डाएट पाळून मी या गाण्यासाठी तयार झाली आहे. अगदी रविवार च्या चीट डे साठी सुद्धा निरोगी आहार ठेवून मी या गाण्यासाठी टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी मेहनत घेतली आहे ” 

 तिच्या कमाबद्दलच्या या गोष्टीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. याआधी ‘मद्रास कॅफे’ आणि ” योद्धा ” सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवणारी ही अभिनेत्री हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ मध्ये कमालीची भूमिका साकारणार आहे. 

 राशी आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दोन्ही कलाकार पत्रकारांच्या भूमिकेत दिसणारा हा चित्रपट 2 ऑगस्ट, 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राशी हा हिंदी चित्रपट ‘TME’ आणि तेलुगु चित्रपट ‘तेलुसू काडा’ प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.

कसब्यात प्राचीन ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ उत्सवानिमित्त बगाड

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; पारंपरिक पद्धतीने गुलाल व फुलांची मुक्त उधळण
पुणे : पालखी खांद्यावर घेताच फुले आणि गुलालाची झालेली मुक्त उधळण… श्री काळ भैरवनाथ महाराज की जय.. चा अखंड जयघोष आणि पारंपरिक वाद्य  ढोल-ताशा व बँड च्या निनादात कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांची पालखी व बगाड मोठया उत्साहात साजरे झाले. शेकडो वर्षांची परंपरा जपत साजरा झालेला बगाड उत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. 
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांच्या उत्सवांतर्गत पालखी व बगाड उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा मोठया उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यानंतर महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. 
मंदिराला फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. त्यामुळे या मंदिराला व येथील उत्सवाला विशेष महत्व आहे.

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास’

‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे.   

अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने करणार आहे. आपल्या ३२ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे  पुष्कर या नाटकात ‘अतरंगी’ भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी ‘उंची’ गाठणार आहेत. ती उंची कशी गाठणार? हे पाहण्यासाठी  ‘आज्जीबाई जोरात’ हे  नाटक पाहावं लागणार आहे. 

‘पहिल्यांदाच बालनाट्यात काम करायला मिळणं आणि वेगळा रोल जो मला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. ते करण्यासाठी उत्सुक असल्याचे पुष्कर यांनी सांगितले’. माझ्यासाठी ३० एप्रिल तारीख खास आहेच पण आमच्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकासाठी सुद्धा तारीख खास ठरावी. नाट्यरसिकांनी उत्तम प्रतिसाद देत ‘आज्जीबाई जोरात’चे जोरात स्वागत करावे,  अशी आशा पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली. 

लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं कोरं AI बालनाट्यरंगभूमीवर घेऊन येतायेत. जिगीषा-अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे अशी कलाकारांची फळी आहे.  हे नाटक विनोदाच्या अंगानं जाणारी फँटसी आहे. दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी,  प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. संगीत सौरभ भालेराव तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे.

आता नीरज पांडे तमन्ना भाटिया ठरतेय दिग्दर्शकांची फर्स्ट चॉईस

 पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटियाने दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची जादू दाखवली असून आता ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आता चर्चेत आली आहे. स्वबळावर तमन्ना ने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांची ती फर्स्ट चॉईस बनली आहे. 

तमन्नाचा फिल्मोग्राफी प्रवास कमालीचा आहे यात शंका नाही ! मधुर भांडारकर, सुजॉय घोष, रॉबी ग्रेवाल, दिनेश विजान आणि अरुणिमा शर्मा यांसारख्या दिग्गज फिल्ममेकर्स सोबत तिने काम करून स्वत:ला तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं आहे ज्यांनी तमन्नाचा कधीही न पाहिलेला अवतार समोर आणला आहे. आता तमन्ना नीरज पांडेसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी एकत्र येत असल्याचा चर्चा आहेत. 

 तमन्नाचा नीरज पांडेसोबत नवा प्रोजेक्ट् काय असणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. जे सिद्ध करते की ती बी-टाऊनमध्ये दिग्दर्शकांची कशी आवडती बनत आहे. तमन्ना नीरज पांडेसोबत काम करत असल्याच्या बातमीने प्रेक्षकांना आधीच उत्सुकता लागली असून आता नवीन काय हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे ! तमन्नाचा हा अनटायटल प्रोजेक्ट या वर्षी ओटीटी रिलीज होईल असे कळतंय. 

केसवानी किंग्ज इलेव्हन, पुणे वॉरियर्सची विजयी सलामी

आसवानी क्रिकेट कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे शानदार उद्घाटन; पिंपरीमध्ये २४ दिवस रंगणार स्पर्धा

पुणे : आसवानी क्रिकेट कप (एसीसी) क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वामध्ये केसवानी किंग्ज इलेव्हनने संत कंवरम लायन्सचा, तर फ्रेंड्स फॉरेव्हर पुणे वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स वरुण संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली. ‘ये है पिंपरी का त्योहार’ अशी टॅगलाईन घेऊन होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ संघ खेळत असून, टी-१० असे स्पर्धेचे स्वरूप आहे. 

पुढील २४ दिवस ही पिंपरी येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर चालणाऱ्या या स्पर्धेत पिंपरी इंडियन्स, रत्नानी नाईट रायडर्स, मंगतानी टायटन्स, तिल्वानी चार्जर्स, एफएफ पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स वरुण, केसवानी किंग्ज इलेव्हन, वाधवानी सनरायझर्स, मोटवानी रॉयल्स, आसवानी डेअरडेविल्स, संत कंवरम लायन्स, देव टस्कर्स, डायमंड सुपरकिंग्ज, रामचंदानी सुपरजायंट्स, सिंध ब्लास्टर्स, छाब्रिया रायझिंग स्टार्स या १६ संघांचा समावेश आहे.

‘एसीसी २०२४’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. प्रसिद्ध उद्योगपती व जेटलाईन इंडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी व सहव्यवस्थापकीय संचालक राकेश नवानी यांच्या हस्ते झाले. प्रसंगी स्पर्धेचे प्रमुख संयोजक व आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी, अनिल आसवानी, विजय आसवानी यांच्यासह संघमालक, प्रायोजक व सिंधी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण पिंपरी शहर आसवानी क्रिकेट स्पर्धेने सजले आहे. उद्घाटनापूर्वी शगुन चौकातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

राजन नवानी व राकेश नवानी यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आसवानी यांचे कौतुक केले. सिंधी समाजातील तरुणांना एकत्रित आणून त्यांच्यातील खेळाडू घडवण्याचा हा उपक्रम आहे. क्रिकेट लोकांना जोडण्याचे माध्यम असून, सलग तीन वर्षे हा उपक्रम पिंपरीत होतोय, याचा आनंद वाटतो. यातून चांगले खेळाडू घडतील आणि तरुणांमध्ये खेळ, तंदुरुस्ती याविषयी जागरूकता होईल, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सर्वानी खिलाडूवृत्तीने खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सिंधी समाजात खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरेल. पुणे व पिंपरीसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा, कर्नाटक, गुजरातमधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचे श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.

संत कंवरम लायन्स आणि केसवानी किंग्ज इलेव्हन यांच्यात पहिला सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना लायन्सने ९.२ षटकांत ८ गडी गमावत ३८ धावा केल्या. प्रतीक भोजवानी (१३) व यश अचोटानी (९) यांचा अपवाद वगळता फलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. किंग्जकडून कर्णधार पंकज रामवानीने १५ धावांत ३, विशाल रावलानी याने एकही धाव न देता २ गडी बाद केले. अवघ्या ३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किंग्जच्या पंकज रामवानी (१६) व कुणाल गंगवानी (१०) यांनी विजय साकारला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पंकज रामवानीला सामनावीराचा किताब देण्यात आला.

दुसऱ्या सामन्यात पुणे वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करत १० षटकांत ८ गडी गमावत ६५ धावा केल्या. दीपक जोऊकानी (१३), कुणाल गुडेला (१०), मनीष कटारिया (१०), अमित वाधवानी (९), अंकुश मुलचंदानी (९) यांनी योगदान दिले. संस्कार गिडवानीने १० धावांत ४, तर जयेश मायारामानीने २९ धावांत २ गडी बाद केले. विजयासाठी ६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चॅलेंजर्सच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करत दोन षटकांत २६ धावा केल्या. मात्र, ही आघाडी पुढील फलंदाजांना टिकवता आली नाही. संथ फलंदाजीमुळे चॅलेंजर्सला १० षटकांत केवळ ५४ धावा उभारता आल्या. कर्णधार परम नानकानीने सर्वाधिक १६ धावा केल्या. दीपक जोऊकानी व मनीष कटारिया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अष्टपैलू कामगिरी करणारा मनीष कटारिया सामनावीराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

संत कंवरम लायन्स – (९.२ षटकांत) ८ बाद ३८ (प्रतीक भोजवानी १३, यश अचोटानी ९, पंकज रामवानी ३-१५, विशाल रावलानी २-०) पराभूत विरुद्ध केसवानी किंग्ज इलेव्हन – (६.१ षटकांत) ३ बाद ३९ (पंकज रामवानी १६, कुणाल गंगवानी १०)

————–पुणे वॉरियर्स – (१० षटकांत) ८ बाद ६५ (दीपक जोऊकानी १३, कुणाल गुडेला १०, मनीष कटारिया १०, संस्कार गिडवानी ४-१०, जयेश मायारामानी २-२९) विजयी विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वरुण  (१० षटकांत) ५ बाद ५४ (परम नानकानी १६, रचित नानकानी ८, दीपक जोऊकानी १-३, मनीष कटारिया १-३).

जोजो जगदीश शेट्टीला पकडला …

पुणे- मकोका गुन्हयामध्ये दीड वर्षापासुन फरार असलेल्या जोजो जगदीश शेट्टीला अखेरीस भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडला आहे. …

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर ११९/२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२३,१४३, १४४,१४७,१४८,१४९ आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या गुन्हयातील मागील एक वर्षापासुन WANTED असलेला आरोपी अजित ऊर्फ जोजो जगदीश शेट्टी, वय २३ वर्षे, रा. राजे चौक, रिगल बेकरी जवळ, चव्हाण कॉम्पलेक्स शेजारील बैठेचाळीमध्ये, मोहननगर, पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता .
आरोपी अजित ऊर्फ जोजो जगदीश शेट्टी, वय २३ वर्षे, रा. राजे चौक, रिगल बेकरी जवळ, चव्हाण कॉम्पलेक्स शेजारील बैठेचाळीमध्ये, मोहननगर, पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रीय करुन व तांत्रिक विश्लेषणावरुन शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सतिश मोरे, सचिन गाडे यांना हा फरार आरोपी हा वारजे पोस्ट ऑफिस जवळ असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपीताचा शोध घेतला तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी गुन्हयाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीतांना नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सतिश मोरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा शिवाजीनगर गावठाणात थाटात साजरा

पुणे: ज्ञानोबा माऊली तुकाराम… च्या अखंड नामघोषासह टाळ-मृदुंगांचा गजर आणि पारंपरिक वेशातील भाविक अशा भक्तीमय वातावरणात श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा थाटात काढण्यात आला. शिवाजीनगर गावठाण येथील श्री रोकडोबा मंदिरा येथून ही मिरवणूक काढण्यात आली. कपाळी गुलाल-बुक्का लावून पादुकांचे दर्शन घेत भाविक मिरवणुकीत सहभागी झाले. 
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या सहभागाने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येतो. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. तसेच, सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांनी देखील उत्सवात सक्रिय सहभाग घेतला आहे. 
महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक श्री रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथून शिवाजीनगर गावठाण परिसरात काढण्यात आली. टाळ-मृदुंगांचा गजर आणि कपाळी गुलाल-बुक्का लावून भाविक मिरवणुकीत मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. महाराजांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आली होत्या. तर, फुलांनी पालखी सजविण्यात आली होती. 
उत्सवात विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने झाली. तसेच संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम पार पडले. विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम देखील उत्साहात झाले. संपूर्ण उत्सवात मंदिराला आकर्षक व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

शिकागोच्या फुलरटन हॉल मध्ये १३० वर्षानंतर पुन्हा घुमलाविज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा उद्घोष

 फुलरटन हॉल मध्ये स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प

पुणे, दि. २४ एप्रिल : “भारतीय तत्वज्ञान हे त्याग, भक्ती, आपुलकी आणि सद्भावना यावर आधारित आहे. परंतु दुर्देवाने जगभरात उच्च प्रगत शैक्षणिक प्रणालीमुळे या पैलूला बगल दिली गेली आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेत भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी उद्गारलेले भविष्यसूचक शब्द केवळ विज्ञान आणि धर्म/अध्यात्म यांचे एकत्रिकरणच मानवजातीत सुसंवाद घडवून शांती निर्माण करेल.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
अमेरिकेच्या ऑर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म संसदे दरम्यान विज्ञान, धर्म आणि अध्यात्म या भूमिकेचे सार आणि तत्वज्ञान सांगितले त्या ठिकाणी शिकागो येथील मराठी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि एमआयटीचे माजी विद्यार्थ्यी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच प्रमाणे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा.मिलिंद पात्रे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
यावेळी विश्वधर्मी प्रा.डॉ विश्वनाथ दा. कराड यांनी फुलरटन हॉल मध्ये स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प घेतला. त्याला उपस्थितांनी अनुमोदन केले.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ पृथ्वीवर सतत वाढत जाणारी अराजकता, रक्तपात , भीषण हिंसाचार आणि दहशतवाद तसेच प्राणघातक कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू त्याबरोबरच आण्विक जैविक आणि रासायनिक अस्त्रांच्या प्रसारामुळे २१व्या शतकाचा शेवट मानवाला दिसेल का नाही याची भिती वाटते. त्यामुळे  जगात शांतता नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजचे आहे. तसेच, मनाचे रसायनशास्त्र आजपर्यंत कोणालाही कळलेली नाही. त्यासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मनाच्या शास्त्राचा समावेश करावा.”
सकारात्मक मानसिकता विकसित करण्यात आणि जगात शांतता संस्कृतीला चालना देण्यासाठी विज्ञान आणि धर्म यांची नेमकी भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. विज्ञानाची व्याख्या ही एकात्मता शोधणे आणि पदार्थाची अंतिम स्थिती तर धर्माची व्याख्या ही विश्वाचे अंतिम वास्तव समजून घेणे आहे.
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्टया सजग, बौद्धिकदृष्ट्या तीक्ष्ण आणि आध्यात्मिक दृष्टया उन्नत असावे जेेणे करून जागतिक समाज कल्याणासाठी मोठे योगदान देऊ शकतील. मानवी मूल्ये रूजवण्याच्या बाबतीत आधुनिक शिक्षण पद्धतीची कमतरता आहे. मानवाला नैतिक आधार आणि नैतिक मूल्ये प्रदान करण्याचे अध्यात्म एक शास्त्र आहे. त्यातच संपूर्ण जगात शांततेची संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी भारताकडे पाहिले जात आहे.
यावेळी उपस्थितांनी सांगितले की शिकागोच्या फुलरटन हॉल मध्ये १३० वर्षानंतर पुन्हा विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा उदघोष झाला आहे.

पंतप्रधान मोदींची पुण्यातील सभा स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे होणार

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुण्यात येत्या २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची जाहीर सभा रेसकोर्सवर सायंकाळी ७ वाजता होणार आहे. दरम्यान, त्याच दिवशी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या देखील सभा होणार आहेत.

पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या ( Prime Minister Narendra Modi ) उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात 29 एप्रिल रोजी स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे सभा होण्यात असल्याचे भाजप तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभा स्थळात बदल करण्यात आलेले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडुन बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पुण्यात मुरलीधर मोहोळ, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या माहितीनुसार, पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त सभा होणार आहे. या सभेला संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी एसपी कॉलेज ऐवजी रेसकोर्स मैदानावर सभा घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची देखील संयुक्त सभा संपन्न होणार आहे. अद्याप सभेचे ठिकाण निश्चित झालेले नाही. 

पुण्यात पकडली 27 लाखाची रोकड…

पुणे:वाकड – हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान ( Wakad)  निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम पकडली आहे. ही कारवाई काल रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मतदार संघात राजकीय हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासोबतच प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. यात नाकाबंदी करण्यात येत आहे.स्कोडा गाडीतून ही रक्कम आली होती, संबधीत इसम रक्कम कोठून आणली हे सांगू शकलेला नाही, पोलिसांनी आयकर विभागात रीतसर कळविले आहे.

केंद्र व राज्य शासनामार्फत केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा – खासदार बारणे

लोणावळा येथे महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

लोणावळा, दि. 24 एप्रिल – केंद्र व राज्य शासनाने घेतलेले जनहिताचे निर्णय आणि मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवावीत, अशी सूचना मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी लोणावळा येथे सुरू करण्यात आलेल्या महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते काल (मंगळवारी) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, शहराध्यक्ष अरुण लाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख संजय भोईर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव तसेच जीवन गायकवाड, बाळासाहेब सकट, आशिष बुटाला, विजय सकट आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याने तसेच देशहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यामुळे देशवासीयांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोचून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

लोणावळा परिसरात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देखील खासदार बारणे यांनी यावेळी दिली.

त्यापूर्वी खासदार बारणे यांनी लोणावळ्यातील काही मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. हनुमान जयंती उत्सवानिमित्त काही मंदिरात जाऊन दर्शन घेतले. माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, प्रमोद गायकवाड, संजय अडसूळे आदींच्या निवासस्थानी भेट दिली. नांगरगाव येथील लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीच्या कार्यालयात जाऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अध्यक्ष संदीप कोराड, उपाध्यक्ष शीतल पतंगे, संचालक नितीन सोनवणे तसेच लहू भोकसे आदींनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

तुंगार्ली येथील जाखमाता देवी मंदिर, हनुमान मंदिर, खंडाळा येथील जय मल्हार मित्र मंडळाचे श्री खंडोबा देवस्थान, खोंडगेवाडी येथील हनुमान तरुण मंडळाचा हनुमान जन्मोत्सव, सिद्धार्थ नगर येथील श्री संत रोहिदास तरुण मंडळ, जेतवन विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन या ठिकाणीही खासदार बारणे यांनी भेट दिली. जेतन विहार येथे विजय जाधव, संजय अडसुळे, प्रफुल्ल काकडे, योगेश अडसुळे, गौतम गायकवाड, उषा जाधव, सुरेखा चौरे, प्रभाकर गायकवाड आदींनी बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

मंगळसुत्राचे महत्व मोदींना काय माहिती,मतांसाठी घाणेरडे राजकारण करू नका-प्रियांकाची जोरदार चपराक

बेंगलोर -काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सोने आणि मंगळसूत्र’ या वक्तव्यावरून निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, त्यांची आई सोनिया गांधी यांनी देशासाठी आपल्या मंगळसूत्राचे बलिदान दिले आहे.
बंगळुरूमध्ये एका निवडणूक सभेत बोलताना प्रियंका म्हणाल्या, या देशात काय चालले आहे? काँग्रेसला तुमचे मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे, अशी भाषणे दोन दिवसांपूर्वी देण्यात आली. गेल्या 75 वर्षांपासून हा देश स्वतंत्र झाला असून 55 वर्षे काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसने कधी तुमचे सोने किंवा मंगळसूत्र हिसकावले का?पंतप्रधान नेरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवताना प्रियंका म्हणाल्या की, जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आजी इंदिरा गांधींनी त्यांचे सोने दान केले होते.वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या आईच्या मंगळसूत्राने या देशासाठी बलिदान दिले आहे. नरेंद्र मोदींना ‘मंगळसूत्र’चे महत्त्व कळले असते तर त्यांनी अशा अनैतिक गोष्टी बोलल्या नसत्या. नोटाबंदी झाली तेव्हा त्यांनी महिलांची बचत हिरावून घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 600 शेतकऱ्यांनी जीव गमावला, मोदीजींनी त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार केला का? मणिपूरमध्ये एका महिलेला विवस्त्र करून तिचे कपडे जाळण्यात आले तेव्हाही मोदीजी गप्प राहिले काहीही बोलले नाहीत, अशा शब्दात प्रियंका यांनी मोदींचा समाचार घेतला.
प्रियंका पुढे म्हणाल्या, ते आज महिलांना मतदान करण्यासाठी अशा गोष्टी सांगत आहे, त्यांना घाबरवत आहे जेणेकरून त्या घाबरून मतदान मतदान करतील. अशा गोष्टी करायला त्यांना लाज वाटायला पाहिजे.आपल्या भाषणाच्या शेवटी प्रियंका म्हणाल्या, “एक काळ असा होता की जेव्हा एखादा नेता उभा राहीला की देशातील जनतेला त्याच्याकडून नैतिकतेची अपेक्षा असायची. पण आज देशाच्या सर्वात मोठ्या नेत्याने नैतिकता सोडली आहे.”
“आज देशाचा सर्वात मोठा नेता आपला प्रभाव, आपला अभिमान आणि आपली कीर्ती दाखवण्यासाठी बाहेर पडतो, परंतु एक काळ असा होता की नेते परोपकारी होते आणि सेवाभिमुख पण आता देशातील सर्वात मोठ्या नेत्यामध्ये लोकांना फक्त अहंकार दिसतो,” अशा शब्दात प्रियंका यांनी पंतप्रधानांवर टिकास्त्र सोडले.