फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे आर्ट शोकेस प्रदर्शन
पुणे, प्रतिनिधी – ऍनिमल चित्रपटातील मशीनगन, ओपनहाइमर चित्रपटातील अणुस्फोट, हनुमान चित्रपटातील भव्य सेटचा अनुभव पुणेकरांनी घेतला. कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी फ्रेमबॉक्सने आयोजित केलेल्या वार्षिक कला प्रदर्शनातून मिळाली. ग्राफिक्स, गेमिंग, ऍनिमेशन, व्हिज्वल इफेक्ट्स विभागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेल्या कामांचा आढावा या स्टुडन्ट आर्ट शोकेस मधून घेण्यात येतो. फर्ग्युसन कॉलेज रोड येथील फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे आर्ट शोकेस प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन फिक्कीचे संचालक आशिष कुलकर्णी, फ्रेमबॉक्स २.० चे संस्थापक व संचालक राजेश तुराखिया, उपाध्यक्षा विनिता बचानी यावेळी उपस्थित होत्या.
विनिता बचानी म्हणाल्या की, कोणताही सिनेमा, जाहिरात किंवा गेमिंग तेंव्हाच पसंत केली जाते जेंव्हा त्यामध्ये विविध सेटची भव्यता, लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आणि सिनेमॅटिक दृश्य अतिशय कल्पकतेने केलेली असतात. हे सर्व साकारताना मेहनत, सातत्य आणि कलाकारांची कसोटी पणाला लागते. बाहुबली, ब्रम्हास्त्र सारख्या भारतीय चित्रपटातील या स्पेशल इफेक्ट्सने हॉलिवूडच्या तंत्रज्ञांनी मागे सारले आहे. लहानपणापासून आपण सर्वच जण विविध गेम्स टीव्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून खेळत आलो आहोत. याच गेमिंगचा उपयोग करून भविष्यात अनेकजण नोकरी मिळवू शकतात. भारतातील किंबहुना जगभरात असलेल्या या क्षेत्रातील संधी काय आहेत या संबंधी या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली.
आशिष कुलकर्णी म्हणाले, अॅनिमेशन, व्हीएफएक्स साकारताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला आहे. यासाठी कथाकथन आणि ललित कले बरोबर तंत्रज्ञानाचा वापर खुबीने केलेला दिसून येतो. या सर्व कलांचा अनुभव घेत असताना विद्यार्थ्यांनी निरीक्षण, विचार, कल्पना, अनुभव, प्रयोग, निर्मिती आणि पुनःनिर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली. फ्रेमबॉक्सच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया अतिशय मजबूत केला आहे. तंत्रज्ञान आणि नवीन घडामोडींसह अद्ययावत राहण्याचा सल्ला कुलकर्णी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
राजेश तुराखिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती या वार्षिक कला प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या गेल्या ज्यामुळे पालकांसह या क्षेत्रातील दिग्गजांना याचा आनंद घेता आला. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री मार्केट लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षामध्ये देशातील गेमिंग इंडस्ट्रीसह इतर AVC म्हणजेच अॅनिमेशन, व्हीएफएक्स, कॉमिक्स या सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.