आसवानी क्रिकेट कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे शानदार उद्घाटन; पिंपरीमध्ये २४ दिवस रंगणार स्पर्धा
पुणे : आसवानी क्रिकेट कप (एसीसी) क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वामध्ये केसवानी किंग्ज इलेव्हनने संत कंवरम लायन्सचा, तर फ्रेंड्स फॉरेव्हर पुणे वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स वरुण संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली. ‘ये है पिंपरी का त्योहार’ अशी टॅगलाईन घेऊन होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ संघ खेळत असून, टी-१० असे स्पर्धेचे स्वरूप आहे.
पुढील २४ दिवस ही पिंपरी येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर चालणाऱ्या या स्पर्धेत पिंपरी इंडियन्स, रत्नानी नाईट रायडर्स, मंगतानी टायटन्स, तिल्वानी चार्जर्स, एफएफ पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स वरुण, केसवानी किंग्ज इलेव्हन, वाधवानी सनरायझर्स, मोटवानी रॉयल्स, आसवानी डेअरडेविल्स, संत कंवरम लायन्स, देव टस्कर्स, डायमंड सुपरकिंग्ज, रामचंदानी सुपरजायंट्स, सिंध ब्लास्टर्स, छाब्रिया रायझिंग स्टार्स या १६ संघांचा समावेश आहे.
‘एसीसी २०२४’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. प्रसिद्ध उद्योगपती व जेटलाईन इंडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी व सहव्यवस्थापकीय संचालक राकेश नवानी यांच्या हस्ते झाले. प्रसंगी स्पर्धेचे प्रमुख संयोजक व आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी, अनिल आसवानी, विजय आसवानी यांच्यासह संघमालक, प्रायोजक व सिंधी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण पिंपरी शहर आसवानी क्रिकेट स्पर्धेने सजले आहे. उद्घाटनापूर्वी शगुन चौकातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
राजन नवानी व राकेश नवानी यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आसवानी यांचे कौतुक केले. सिंधी समाजातील तरुणांना एकत्रित आणून त्यांच्यातील खेळाडू घडवण्याचा हा उपक्रम आहे. क्रिकेट लोकांना जोडण्याचे माध्यम असून, सलग तीन वर्षे हा उपक्रम पिंपरीत होतोय, याचा आनंद वाटतो. यातून चांगले खेळाडू घडतील आणि तरुणांमध्ये खेळ, तंदुरुस्ती याविषयी जागरूकता होईल, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सर्वानी खिलाडूवृत्तीने खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
सिंधी समाजात खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरेल. पुणे व पिंपरीसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा, कर्नाटक, गुजरातमधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचे श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.
संत कंवरम लायन्स आणि केसवानी किंग्ज इलेव्हन यांच्यात पहिला सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना लायन्सने ९.२ षटकांत ८ गडी गमावत ३८ धावा केल्या. प्रतीक भोजवानी (१३) व यश अचोटानी (९) यांचा अपवाद वगळता फलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. किंग्जकडून कर्णधार पंकज रामवानीने १५ धावांत ३, विशाल रावलानी याने एकही धाव न देता २ गडी बाद केले. अवघ्या ३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किंग्जच्या पंकज रामवानी (१६) व कुणाल गंगवानी (१०) यांनी विजय साकारला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या पंकज रामवानीला सामनावीराचा किताब देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात पुणे वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करत १० षटकांत ८ गडी गमावत ६५ धावा केल्या. दीपक जोऊकानी (१३), कुणाल गुडेला (१०), मनीष कटारिया (१०), अमित वाधवानी (९), अंकुश मुलचंदानी (९) यांनी योगदान दिले. संस्कार गिडवानीने १० धावांत ४, तर जयेश मायारामानीने २९ धावांत २ गडी बाद केले. विजयासाठी ६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चॅलेंजर्सच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करत दोन षटकांत २६ धावा केल्या. मात्र, ही आघाडी पुढील फलंदाजांना टिकवता आली नाही. संथ फलंदाजीमुळे चॅलेंजर्सला १० षटकांत केवळ ५४ धावा उभारता आल्या. कर्णधार परम नानकानीने सर्वाधिक १६ धावा केल्या. दीपक जोऊकानी व मनीष कटारिया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अष्टपैलू कामगिरी करणारा मनीष कटारिया सामनावीराचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
संत कंवरम लायन्स – (९.२ षटकांत) ८ बाद ३८ (प्रतीक भोजवानी १३, यश अचोटानी ९, पंकज रामवानी ३-१५, विशाल रावलानी २-०) पराभूत विरुद्ध केसवानी किंग्ज इलेव्हन – (६.१ षटकांत) ३ बाद ३९ (पंकज रामवानी १६, कुणाल गंगवानी १०)
————–पुणे वॉरियर्स – (१० षटकांत) ८ बाद ६५ (दीपक जोऊकानी १३, कुणाल गुडेला १०, मनीष कटारिया १०, संस्कार गिडवानी ४-१०, जयेश मायारामानी २-२९) विजयी विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वरुण – (१० षटकांत) ५ बाद ५४ (परम नानकानी १६, रचित नानकानी ८, दीपक जोऊकानी १-३, मनीष कटारिया १-३).