Home Blog Page 1078

पुणे कॅन्टॉन्मेंट व वडगाव शेरी पदयात्रेत रवींद्र धंगेकरांना चांगला प्रतिसाद..

पुणे-पुणे लोकसभा मतदार संघातील पुणे कॅन्टॉन्मेंट आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पदयात्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सायंकाळी वडगाव शेरी आणि बुधवारी सकाळी पुणे कॅन्टॉन्मेंट मतदार संघात शेकडो कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग असणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वडगाव शेरी येथील पदयात्रा मातृछाया हौसिंग सोसायटी येथून सुरु होऊन साईनाथ नगर येथे समाप्त झाली, तसेच पुणे कॅन्टॉन्मेंट मधील पदयात्रा लुंबिनी बौध्द विहार येथे सकाळी सुरु होऊन भारत टॉकिज येथे समाप्त झाली.

     या पदयात्रांमध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. मार्गावर ठिकठिकाणी फुले उधळून पाठिंब्याच्या घोषणा दिल्या जात होत्या. अनेक व्यापाऱ्यांनी धंगेकरांचा सत्कार केला व मार्गावरील सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते देखील एकत्र जमून धंगेकरांचा सत्कार करीत होते. अपोलो थेटर जवळ रवींद्र धंगेकर यांना ‘महात्मा फुले पगडी’ डोक्यावर चढवून सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेस पक्षाचे चिन्ह ‘पंजा’ होते. जयजयकाराच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून जात होता. दोन्ही पदयात्रांमध्ये प्रत्येकी ४०० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

     या पदयात्रांमध्ये उमेदवार रवींद्र धंगेकरांसमवेत पुणे कॅन्टॉन्मेंट मतदार संघात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, संगीता तिवारी, अक्षय माने, सुजित यादव, पल्लवी जावळे, रवी आरडे, वैशाली रेड्डी, दत्ता पोळ, छाया वारभुवन, विजय वारभुवन, फय्याज शेख, प्रल्हाद विळेकर, राजेश शिंदे, मेहबूब नदाफ, शुभम कसबे, नतेंद्र भिंगारे, अय्याज खान, निलेश धुमाळ, नरेश नलावडे, गणेश शेडगे, महेश हाराळे, गोरख पळसकर, योगेश भोकरे, अमोल भोकरे, भारती कांबळे, बबलू कोळी, फिरोज शेख, प्रभाकर भिंगारे, चंद्रशेखर धावडे, चंद्रशेखर जावळे, नागेश शिंदे, दत्ता घोडेस्वार, कणव चव्हाण, ताई भिमाले आदी सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वडगाव शेरी मतदार संघात उमेदवार आ. रवींद्र धंगेकरांसमवेत वडगाव शेरी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, येरवडा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वडगाव शेरी अध्यक्ष आशिष माने, आम आदमी पार्टी वडगाव शेरी समन्वयक अमित म्हस्के, महाराष्ट्र प्रदेश एन एस यू आय अध्यक्ष अमीर शेख,पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाट, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, माजी नगरसेविका संगीता देवकर, माजी नगरसेवक सुनिल मलके, रमेश आढाव, संकेत गलांडे, वडगाव शेरी महिला ब्लॉक अध्यक्ष शिवानी माने, प्रियांका रणपिसे,सीमा गट्टे, प्रकाश काळे, सोमनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन भुजबळ आदी सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुरलीधर मोहोळ यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ शहराच्या पर्यावरणासाठी घातकी- डॉ. विश्वंभर चौधरी

पुणे-शहरातील सर्व आमदार, खासदार, शंभर नगरसेवक निवडून देवून पुणेकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र या काळात भाजपच्या सत्ताधार्‍यांनी पुण्यासाठी काही दिले नाही. त्यांनी नदीचे वाटोळे केले, शहरातील टेकड्या उद्धवस्त करण्याचा घाट घातला. भाजप कार्यकाळ आणि मुरलीधर मोहोळ यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ शहराच्या पर्यावरणासाठी घातकी ठरला आहे, अशी टिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केली.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चौधरी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, वीरेंद्र किराड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी इत्यादी उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, भाजपने शहराची सत्ता उपभोगताना पर्यावरणवाद्यांना विश्वासात न घेता, पर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प आणले. त्यांचा कारभार हुकूमशाही पद्धतीने केला. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. पाण्याचा प्रश्न ही गंभीर होत आहे, त्यांनी यावर काहीच केले नाही. या गोष्टी आम्ही ‘निर्भय बनो’ सभेच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडणार आहोत. आम्ही उमेदवारांचा थेट प्रचार करत नाही. मात्र देशातील परिस्थिती पाहून आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा देत आहोत. आम्ही मत मागत नाही पण लोकांची मते बदलतो. विदर्भात काँग्रेसची लाट आहे. तर मराठ्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांची लाट आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील,  असेही चौधरी म्हणाले.

गेल्या दहा वर्षातील मोदी यांच्या कारकिर्दीचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसल्याचे विदर्भ, मराठवाडा येथे घेतलेल्या निर्भय बनोच्या सभामध्ये निदर्शनास आले. नरेंद्र मोदींनी सत्तेच्या माध्यमातून संविधानाला नख लावण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे काम सुरू केले आहे. भाजपने लोकसभेच्या पहिल्या दोन निवडणुकांमध्येही विकासाचा मुद्दा आणला नाही. ही निवडणुक निवडणुक रोखे व विकासावर आधारीत आहे, त्यामुळे मोदींनी दोऩ दिवसांपासून हिंदु मुस्लिमांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यायव इतर गोष्टी आहेत. मात्र, भाजपकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्यासंदर्भात धादांत खोटा प्रचार केला जात आहे. रामाचा मुद्दा संपलेला आहे. त्यामुळे ते धर्माकडे निवडणुक नेते आहेत. राज्यात मागील दोन महिन्यात 457 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मात्र, यावर भाजपचे कोणीच बोलत नाहीत. 

प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

वंचितमुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होणार ःअ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची विनंती केली होती. तसे पत्रही दिले होते. मात्र, त्याला यश मिळाले नाही. वंचितने पुण्यात उमेदवार देवू नये, अशीही आमची मागणी होती. मात्र ती मान्य झाली नाही. वंचितच्या उमेदवारामुळे भाजप विरोधी मतांचे विभाजन होणार आहे, त्याला आता कोणी काहीच करू शकत नाही.

पुण्यात लवकरच निर्भय बनो सभा ःमोदींच्या कारकीर्दीच्या विरोधात आम्ही राज्यात निर्भय बनोच्या 65 सभा घेतल्या. आणखी 18 मे पर्यंत आम्ही सभा घेणार आहोत. यामध्ये पुण्यात एक सभा होणार आहे. पुण्यात आमच्या वर हल्ला झाल्यानंतर राज्यातील इतर सभांसाठी आम्हाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी संरक्षण दिले. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर पुन्हा आम्ही राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये जावून निर्भय बनोच्या सभा घेणार आहोत, असेही चौधरी म्हणाले.

धंगेकरांच्या प्रचाराला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ः जोशी

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिवर्तनाची लाट पुण्यात आली आहे, याची प्रचिती दररोज आम्हाला येत आहे. प्रचाराचा पहिला टप्पा पार पडला आहे. लोकांमध्ये भाजपविरोधात मोठा रोष असल्याचे या टप्प्यात निदर्शनास आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी यांनी दिली.

‘लोकशाही हीच सत्याग्रहाची फलश्रुती’ :डॉ. अशोक चौसाळकर

पुणे :

‘अगदी लहान मुलाला सत्याग्रहातून आत्मबळ मिळाल्याने स्वातंत्र्य लढा व्यापक झाला आणि भारताला लोकशाही मिळाली ,हीच सत्याग्रहाची फलश्रुती आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी बुधवारी सायंकाळी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड) येथे ज्येष्ठ विश्लेषक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांच्याहस्ते झाले.यावेळी चौसाळकर बोलत होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संयोजन समितीच्या वतीने अन्वर राजन,संदीप बर्वे आणि जांबुवंत मनोहर यांनी स्वागत केले.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार मराठीत यावेत यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर यांनी विशेष प्रयत्न केले.त्यातून ‘सत्याग्रह विचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. प्रथमावृत्तीचे प्रकाशन मामासाहेब देवगिरीकर यांच्याहस्ते झाले होते.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे द्वितीय अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.महात्मा गांधींच्या विचारांचे सार या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे एकूण २० खंड आहेत.त्यातील चौथ्या खंडाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, अरूण खोरे, संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर आदी उपस्थित होते. अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक अन्वर राजन यांनी केले.

डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले,’ महात्मा गांधी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. सत्याग्रहाचे आचरण आणि त्याचा आशय अंगी बाणवला पाहिजे.सत्याग्रह ही मजबुरी नाही. तर अन्याय सहन न करता तीव्र आणि अहिंसात्मक प्रतिकार करणे हे सत्याग्रहाचे सार आहे. निर्भिडपणा येतो. भीतीने नैतीक अधःपतन होते.आत्मबळाने आपण व्यवस्थेला आव्हान देऊ शकतो. सत्याग्रहाने सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर परिणाम होतात.सत्याग्रह करणाऱ्यांचा उपहास, निंदा केली जाते, दडपशाही केली जाते. सत्याग्रहाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतो.या कसोट्यातून उत्तीर्ण झाल्यावर आदर निर्माण होतो.व्यक्तीच्या ह्रदय परिवर्तनासाठी सत्याग्रह आवश्यक आहे. सत्याग्रहीने उद्दीष्टापासून हटू नये. सत्याग्रहींच्या सामूहिक आत्मबळातून देखील मोठे परिवर्तन घडते.भौतिक लाभ मिळवणे हा सत्याग्रहाचा उद्देश नसतो, असेही डॉ. चौसाळकर यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ परिवर्तनासाठी आपण रोज प्रयत्न केले तर सामान्य माणूस देखील महात्मा होतो, ही सत्याग्रह आणि सर्जनशिलतेची ताकद आहे. समाजवादी मंडळी गांधीवादी झाल्याशिवाय ते काल सुसंगत ठरणार नाहित.लोकशाहीची प्रतिनिधि शाही होवू नये असे वाटत असेल तर सत्याग्रह सामाजिक जीवनात असला पाहिजे. वैयक्तिक जीवनात देखिल सत्याग्रह हे महत्वाचे मूल्य आहे’.

राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलांचा संघ उपविजेता तर मुलींच्या संघास कांस्य पदक

पुणे, दि. २४ : भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्याद्वारा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित ६७ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या दिवशी १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धा बाद पद्धतीने संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलांचा संघ उपविजेता तर मुलींच्या संघास कांस्य पदक मिळाले.

आज झालेल्या स्पर्धेत बिहारच्या मुलांचा व मुलींचा संघ अजिंक्य ठरले तर मुलांच्या गटात महाराष्ट्र संघ उपविजेता तर दिल्ली संघ तृतीय क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात ओरिसा संघ उपविजेता तर महाराष्ट्र संघ तृतीय क्रमांकावर राहिला.

१९ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघ बिहार संघाकडून पराभुत होवून रौप्य पदकाचा मानकरी तर मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने छत्तीसगढ संघास ५२ गुणांनी पराभूत करुन कांस्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघातील तृप्ती पाटील ५, नम्रता पाटील २६, समृद्धी कदम ५, स्वाती हगवणे ६, सुमन रावत ५ व कावेरी बागुल २२ असे गुण मिळविले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भारतीय शालेय खेळ महासंघाचे निरीक्षक मुकेश कुमार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी विकास चौरसिया, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते, शिल्पा चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी मनसे पूर्ण ताकतीनिशी प्रचार करणार – नितीन सरदेसाई

खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा मनसेचा निर्धार

खोपोली, दि. 24 एप्रिल – महाराष्ट्र सैनिकांसाठी राज साहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. त्यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरेल, अशी ग्वाही मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- मनसे- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक खोपोली येथील युके रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. बैठकीस खासदार बारणे, आमदार महेंद्र थोरवे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमित खोपकर, मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी रणजीत शिरोळे, जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, मनसेचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच विजय पाटील, योगेश चिले व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरदेसाई म्हणाले की, राज साहेबांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा प्रचार पूर्ण ताकतीनिशी करणार आहोत. निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या खासदारांनी पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून विकासाची कामे करावीत, एवढीच महाराष्ट्र सैनिकांची अपेक्षा आहे.

राज ठाकरे यांचा निर्णय दूरदृष्टीचा आहे, असे मत आमदार थोरवे यांनी व्यक्त केले. शिवसेना आणि मनसे यांची विचारधारा एकच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊनच दोन्ही पक्ष काम करीत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये काही मतभेद असले तरी मनभेद कधीच नव्हते, असेही ते म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले की, मी संघर्षातून पुढे आलो आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शासकीय योजना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता आल्या. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ही देशातील जनतेची भावना आहे. त्यामुळे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

निवडणुकीनंतरही समन्वयाच्या भूमिकेतून पुढील काम करू व मनसेला दिलेला शब्द पाळू, अशी ग्वाही देखील खासदार बारणे यांनी दिली.

कृष्णराव भेगडे यांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांचा तळेगावात प्रचार

तळेगाव दाभाडे येथील मान्यवरांच्या खासदार बारणे यांनी घेतल्या गाठीभेटी

तळेगाव दाभाडे, दि. 24 एप्रिल – पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काल (मंगळवारी) रात्री तळेगाव दाभाडे शहरातील काही मान्यवरांची भेट घेऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले.

खासदार बारणे यांच्या तळेगाव दाभाडे दौऱ्यात त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे तसेच प्रशांत ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, संतोष भेगडे, अरुण माने, नवनाथ हारपुडे, सुनील मोरे आदी पदाधिकारी होते.

माजी नगरसेवक अरुण माने, माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे, ‌ सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई शिकीलकर, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, सामाजिक कार्यकर्ते संकेत खळदे, नामवंत उद्योजक इंदरशेठ ओसवाल, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शैलाताई कैलास काळोखे, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे व कृष्णा कारके आदी मान्यवरांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. ठिकठिकाणी फटाके वाजवून व औक्षण करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तळेगाव दाभाडे येथील मारुती व शनी मंदिरात जाऊन बारणे यांनी दर्शन घेतले. कडोलकर कॉलनी येथील गुर्जर क्षत्रीय समाज मंदिर ट्रस्टच्या राम मंदिरास त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी ब्रिजेंद्र किल्लावाला व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीराम जनमानस मंडळीच्या हनुमान जयंती उत्सवातही खासदार बारणे यांनी हजेरी लावली.‌ मुख्य संयोजक राजेश शर्मा, राजू बारसकर, परमेश्वर ठाकूर यांनी त्यांचा सत्कार केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार

पुणे, दि. २४: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी संस्थेतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन चेंबरकडून लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी घेण्यात येत असलेल्या पुढाकाराची माहिती दिली.

पुणे शहरातील मतदानाचे कमी प्रमाण लक्षात घेता शहरी भागात आणि विशेषत: औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कामगारांना मतदान करण्यासाठी संस्थेने प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी व्यक्त केली.

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून आणि औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्षात भेट घेवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मतदान टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.

पुण्यातील नागरिकांना त्यांच्या नागरी हक्क आणि कर्तव्यांची सखोल जाणीव आहे. पुणे हे नागरी सहभागाच्या संस्कृतीचे वेगळेपण जपते आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिक मतदान करून ही परंपरा जोरकसपणे पुढे न्यायला हवी. त्यामुळे पुण्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रात मतदार जागृतीसाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढेल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचा मतदार जागृती उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल. पुणे जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रमुखांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

मोशी – पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मोशी येथे बैठक पार पडली या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

देशामध्ये सर्वाधिक जागा काँगेस लढत आहे, देशातील वारं बदललं आहे. भाजप सरकारने महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपच्या सरकारवर नाराज आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे वारे वाहू लागले आहे. केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असं म्हणत डॉ. कोल्हे यांनी केंद्रातील सरकार बदलणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

पुढे बोलताना डॉ. कोल्हे म्हणले की, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या बहीण भावाकडे हा देश संघर्षाचे प्रतीक म्हणून बघत आहे. एकदा दिल्लीतील एक मोठे नेते सांगत होते की, काँग्रेस ही आजगरासारखी प्रचंड अवाढव्य आहे, पण ती सुस्त आहे असं वाटत राहतं, तसं आजगराकडे पाहिलं की वाटतं आजगर सुस्त आहे, पण तोच आजगर भुकेलेला असतो आणि त्याला भक्ष्य दिसतं तेव्हा आजगराऐवढी ताकद इतर कोणत्याही प्राण्यात नसते. अगदी तसं काँग्रेस असल्याचं आहे असे यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. दरम्यान डॉ. कैलास कदम, चंद्रकांत लोंढे, गौतम अरताडे बाबू नायर, जॉर्ज मॅथु, सोमनाथ शेळके, भरत वाल्हेकर, अण्णा कसबे, अक्षय उदगीरे, धनंजय आल्हाट, वहाब शेख, विठ्ठल शिंदे, नरेंद्र बनसोडे, सुप्रिया पोहरे, मनीषा गरुड, अनिता अधिकारी, उषा साळवी यांसह अनेक महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘प्रेरणा’ उत्सवात एस. बी. पाटीलच्या कस्तुरी पाटील ची निवड-वडनेर गुजरात येथे होणार नेतृत्व स्पर्धेत सहभागी

पिंपरी, पुणे (दि. २४ एप्रिल २०२४) सीबीएसईच्या वतीने प्रेरणा उत्सव नेतृत्व विशेषता स्पर्धा जवाहर नवोदय विद्यालय शिरूर येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील विद्यालयातील विद्यार्थीनी कस्तुरी किरण पाटील हिची निवड झाली असून पुढील राष्ट्रीय स्पर्धा वडनेर, गुजरात येथे २७ एप्रिल ते चार मे या कालावधीत होणार आहे.
प्रेरणा उत्सव – नेतृत्व विशेष स्पर्धा तीन स्तरांमध्ये घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील प्रत्येक शाळेतून इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दोन विद्यार्थी निवडले गेले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय, शिरूर, पुणे येथे निबंध, कविता, चित्राद्वारे कलागुणांचे सादरीकरण केले. ‘माझ्या दृष्टीपथातील भविष्यातील भारत’ या विषयावर कस्तुरी पाटील ने चित्र काढले. दुसऱ्या स्तरात ‘विकासित भारत’ तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तिसऱ्या स्तरावर विद्यार्थ्यांना आवडते विषय कोणते आणि का, शाळेत जायला आवडते का आदी प्रश्नांना विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली.
एस. बी. पाटील विद्यालयात अभ्यासाबरोबरच इतर विषयांवर मार्गदर्शन केले जाते. यामध्ये रोबोटिक्स, संगीत, विविध मैदानी खेळ, चित्रकला , नृत्य, संगणकशास्त्र आदींवर भर दिला जातो. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होता येते.
पुणे जिल्ह्यायातील ३० विद्यार्थ्यां मधून दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिक्षिका स्वलेहा मुजावर, क्रांती कुलकर्णी, प्राचार्या डॉ.बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा यांचे मार्गदर्शन कस्तुरीला लाभले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कस्तुरीचे कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळणार, युवकांसाठीही योजना; राहुल गांधींची सोलापूरमध्ये घोषणा

सोलापूर ”महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांची यादी बनवली जाईल. यामध्ये सगळ्या जाती, धर्मातील महिलांच्या प्रत्येक कुटुंबातील एका महिलेचा समावेश केला जाईल. शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक.. कोट्यवधी महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देईल.”असे सोलापूर येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, जेवढा जीएसटी तुम्ही भरता तेवढाच अदानीदेखील भरतात. तरीही सरकारकडून त्यांना अधिकची मुभा दिली जाते. देशामध्ये १ टक्के लोकांकडे ४० टक्के मालमत्ता आहे. भाजप सरकारने देशात २०-२५ अरबपती बनवले आहेत. मात्र आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत.योजनेची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले की, सध्याच्या घडीला स्त्री-पुरुष दोघेही जॉब करतात. स्त्रीया घरचं सगळं काम करुन, मुलांचं सगळं बघून कामाला जातात. त्यासाठी त्या वेगळा मोबदला मागत नाहीत. त्यामुळे आम्ही स्त्रीयांसाठी महालक्ष्मी योजना आणणार आहोत.

महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांची यादी बनवली जाईल. यामध्ये सगळ्या जाती, धर्मातील महिलांच्या प्रत्येक कुटुंबातील एका महिलेचा समावेश केला जाईल. शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक.. कोट्यवधी महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देईल. महिन्याला ८ हजार ५०० रुपये मिळतील, अशी घोषणा राहुल गांधींनी केली.यावेळी राहुल गांधींनी बेरोजगार आणि शिक्षित युवकांसाठी एका योजनेची घोषणा केली. ते म्हणाले की, मोदींनी आम्हाला बेरोजगार केलेलं आहे, हिंदुस्थानचं धन अदानीला दिलं, १५ लाखांचा जुमला केला, कोविडमध्ये थाळ्या वाजवल्या. त्यामुळे देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे.देशामध्ये कुणीही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर असेल त्याला अप्रेंटिसशिप मिळेल. लाभार्थ्याला सरकारकडे अप्रेंटीसशिप मागण्याचा अधिकार असेल. त्यातून युवकांना पहिल्या वर्षी एक लाख रुपये बँकेच्या अकाऊंटमध्ये येतील. या योजनेत युवकांना नोकऱ्यासुद्धा देण्यात येणार आहेत. पब्लिक सेक्टर, सरकारी कंपन्या, खासगी कंपन्यांमध्ये जॉब दिले जातील. अशी ग्वाही राहुल गांधींनी दिली.

नरेंद्र मोदी गरिबांचे नाही तर अरबपतींचे नेते, सत्ता जाण्याची भितीने मोदी घाबरले.

इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमरावती व सोलापुरात राहुल गांधींच्या भव्य जाहीर सभा.

लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे लक्ष्य आहे. सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार हे भाजपाचा खासदारच जाहीरपणे सांगत आहे. असे असले तरी संविधानला कोणतीही शक्ती बदलू शकत नाही. संविधान हे एक पुस्तक नसून गरीब, आदिवासी, दलित, सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी ते कोणालाही बदलू देणार नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिला आहे.

इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमरावती व सोलापुरात राहुल गांधी यांच्या भव्य जाहीर सभा झाल्या. या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी यानी १० वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही पंरतु इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी एक आयोग स्थापन केला जाणार असून या आयोगाने शिफारस केली की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, एकदा नाहीतर अनेकदा कर्जमाफी केली जाईल. देशात पैशांची कमी नाही, अरबपतींचे कर्जमाफ होऊ शकते तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकऱ्यांबरोबरच देशातील गरीब महिलांसाठी लखपती बनवले जाईल. गरिब कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात १ लाख रुपये थेट जमा केले जातील म्हणजे महिन्याला ८५०० रुपये देणार. देशात ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे, या बेरोजगारीवत मात करण्यासाठी नवीन कायदा बनवला जाणार असून पदवीधर, डिप्लोमा धारकांना प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल व त्यांना एक वर्षाचे एक लाख रुपये देण्यात येतील. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर देशात प्रशिक्षित युवा फोर्स तयार बनेल.

नरेंद्र मोदींनी देशातील २२ अरबपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. नोटबंदी करुन काळा पैसा बाहेर करण्याचे आश्वासन दिले पण याचा फायदाही मोदींच्या मित्रांनाच झाला. जीएसटीचे पैसे जनतेकडून वसूल करुन मुठभर उद्योगपतींच्या खिशात घातले. नरेंद्र मोदी हे अरबपतींचे नेते आहेत गरिबांचे नेते नाहीत. सत्ता जाण्याची भिताने नरेंद्र मोदी घाबरले आहेत आणि मोदी घाबरले की खोटे बोलण्यास सुरुवात करतात. इलेक्टोरल बाँडमधील भ्रष्टाचार पकडला गेल्याने मोदींची चिंता आणखी वाढली आहे.

नरेंद्र मोदी सरकार हे दलित, आदिवासी विरोधी आहे. आदिवासींना भाजपा वनवासी म्हणून अपमान करते. अयोध्यातील राम मंदिराच्या उद्घाटनात देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत म्हणून बोलावले नाही तसेच संसदेच्या उद्घाटनालाही मोदी यांनी बोलावले नाही. भाजपा आदिवासी समाजावर अन्याय करते पण आदिवासी, दलित, मागासर्गीय, अल्पसंख्याक समाजाला सामाजिक न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष जातनिहाय जनगणना करणार व सामाजिक, आर्थिक सर्वे करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

या प्रचार सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व CWC सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, आ. यशोमती ठाकूर, सुनिल देशमुख, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, शेतकरी नेते व पत्रकार प्रकाश पोहरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बब्लू देशमुख आदी उपस्थित होते.

सोलापुरच्या सभेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माकपा नेते व माजी आमदार नरसय्या आडम, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरुटे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांच्या दौंड तालुका दौऱ्याला सुरुवात; दौंडमध्ये महायुतीचे नेते एकवटले…

पुणे – दौंड दि. २४ एप्रिल – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील खडकी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.

या दौऱ्यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच दौंड तालुक्यात संयुक्त दौरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख एकवटले आहेत. आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भुमिका घेवून सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी यावेळी केले.

देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणुक आहे. विकासाला महत्व देणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.

महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात सामील होवून विकासरथात सहभागी होवून घड्याळाला अधिकाधिक मतदान करावे असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे दौंड तालुक्यातील विविध गावात उत्साहात स्वागत होत आहे.

महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी पवार दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावात गेल्या असता तेथील स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील असा विश्वास दिला. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मतदानाला जाताना घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा: शरद पवारांनी ऐकवले 2014 मधील नरेंद्र मोदी यांचे भाषण

मोदी यांची आश्वासने म्हणजे ‘लबाडा घरचे आमंत्रण….

माढा-‘मतदानाला जाताना घरातील गॅस सिलिंडरला नमस्कार करुन जा’ असे आवाहन करणारे पंतप्रमधान नरेंद्र मोदी यांचे 2014 मधील भाषण शरद पवार यांनी ऐकवले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दिलेला एकही शब्द पाळला नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दिलेला एकही शब्द पाळला नाही. सामान्य लोकांची महागाईतून सुटका केली नाही आणि शिव्या आम्हाला घालत आहात? अहो राज्य तुमच्याकडे, केंद्र तुमच्याकडे, आम्ही विरोधी पक्षात आणि शिव्या आम्हालाच घालता का? असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी पुढे काय करणार हे सांगत आहे. पण मराठीमध्ये एक म्हण आहे. ‘लबाडा घरचे आमंत्रण, जेवल्याशिवाय खरे नाही’ असेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

2014 मध्ये पेट्रोलची किंमत 71 रुपये होती. 2014 च्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलची किंमत निम्म्यावर आणतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, आज पेट्रोलची किंमत 107 रुपये लिटर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात गेली असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आमच्या सरकारच्या काळात गॅस सिलिंडरची किंमत 410 रुपये होती. आता ती किंमत 1160 रुपये आहे. सगळ्याच किमती वाढल्या असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आज पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एकही शब्द पाळा नाही. मात्र, तेच मोदी आज आम्हाला प्रश्न विचारत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केले? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. या दहा वर्षांत तुम्ही नोटाबंदी केली. या नोटाबंदी दोन-तीन दिवस नागरिकांना रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माफी मागा:अमित शहा यांचा शरद पवारांवर हल्ला

अमरावती-अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना विजयी करण्याची विनंती गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी केली होती. यावरुन शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे. मात्र, शरद पवारांना माफी मागायचीच असेल तर विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्यांची माफी मागावी. त्या मृत शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागावी, असे आव्हान अमित शहा यांनी शरद पवारांना दिले आहे. तुम्ही इतकी वर्षे मुख्यमंत्री होतात, केंद्रीय कृषीमंत्री होतात, तरी विदर्भातील सिंचन प्रकल्प का पूर्ण झाले नाही? असा प्रश्न अमित शहा यांनी शरद पवारांना विचारला आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होत असून या मतदार संघांमध्ये आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अमरावतीत नवनीत राणा आणि रामदास तडस यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांनी सभा घेत, या दोन्ही उमदेवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

शरद पवार यांना राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, आरोग्याचे कारण देत ते सोहळ्याला गेले नाहीत. मात्र, आता निवडणुकीचा प्रचार करताना कसे फिरत आहेत? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांना देखील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण दिले होते मात्र, ते सोहळ्याला आले नाही, असे देखील अमित शहा यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना देखील राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी आमंत्रीत केले होते. मात्र, ते पोहोचले नाहीत. आता अमरावतीमध्ये मतदान मागण्यासाठी येत आहेत. मात्र जोपर्यंत आयोध्यात राम मंदिरात जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचे म्हणणे कोणीही ऐकणार नाही, अशा शब्दात अमित शहा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

कलम 370 हटवण्यासाठी राहुल गांधी यांनी विरोध केला होता. तसे झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आता पाच वर्षे झाले आहेत. या पाच वर्षात मातीचा कणही जाळण्याची कोणाची हिम्मत झाली नसल्याचा दावा केंद्रीय गृहमत्री अमित शहा यांनी केला आहे.

नितीन गडकरींना भाषण करताना आली भोवळ:तोल जाऊन पडणार तोच सुरक्षारक्षकांनी सावरले..आराम करून पुन्हा भाषण केले

पुसदकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज पुन्हा भाषण करताना भोवळ आली. त्यांचा तोल जाणारच होता तोच त्यांना त्यांच्या अंगरक्षकांनी सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही धक्कादायक घटना यवतमाळमधील पुसद या ठिकाणी प्रचार सभेदरम्यान घडली. तर गडकरी यांची प्रकृती आता स्थिर आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांना भोवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.

महायुतीच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची सभा पार पडत होती. त्यावेळी अचानक गडकरी यांना पुन्हा भोवळ आली. त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा तोल जाताच त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले. यावेळी स्टेजवरील भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील धाव केली. त्यांना त्वरीत खाली बसवण्यात आले. गडकरींची डॉक्टर टीम त्या ठिकाणी हजर होतीच. त्यांनी तपासून प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली.महायुतीने कडून 400 पारचा नारा दिल्याने प्रचारासाठी कंबर कसली आहे. आज महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यवतमाळमध्ये दाखल झाले. उष्णतेची लाटही पाहायला मिळत आहे. याचा तब्येतीवर परिणाम होऊन गडकरींना सभेदरम्यान भोवळ आल्याचं सांगितलं जात आहे.

महायुतीची सभा सुरु असताना नितीन गडकरी सभेला संबोधित करत होते, यावेळी त्यांना भोवळ आली होती. नितीन गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर नितीन गडकरी यांनी पुन्हा भाषण देखील केले.

विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत नो-पार्किंगबाबत वाहतूक शाखेकडून अंतिम आदेश जारी

पुणे, दि. २४: पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेने यापूर्वी विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार टिळक स्मारक मंदिर प्रवेशद्वाराच्या भिंतीलगत २० मीटर व नारळीकर इन्स्टिट्यूटकडून टिळक स्मारक मंदिरकडे येताना (कुमार स्टेशनरी व झेरॉक्स दुकान) रस्त्याच्या उजव्या बाजूस ५० मीटरपर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.