पुणे : पुण्यात आज दुपारी सोसाट्याचा वारा आणि सायंकाळी सव्वासहा वाजता जोरदार पाऊस अशा वातावरणाने लॉकडाऊन ने त्रस्त झालेल्या पुणेकरांना थोडासा नैसर्गिक असा आल्हाद दायी दिलासा लाभला . शहरातील डेक्कन, कर्वेनगर, वारजे माळवाडी, धायरी, कोथरूड, सिंहगड रस्ता ,कात्रज ,सहकारनगर ,धनकवडी ,मार्केट यार्ड परिसरासह पिंपरी चिंचवड ,पुणे जिल्ह्यात देखील पावसाच्या जोरदार सरीं कोसळल्या.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनीही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.