पुणे – फ्लॅट विक्रीच्या नावाने दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायीक सुधीर दरोडे व आनंद जोग यांच्याविरुध्द डेक्कन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ओनरशीप ऍक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅटचा ताबा न देता 1,53,45,603 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नेरोयिसंग सरोश तारापोरावाला(63,रा.कल्याणीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार दरोडे जोग बिल्डर्सचे संचालक सुधीर दरोडे , आनंद जोग, व्यवस्थापकीय व्यवस्तापक पराग बोरावके, उप व्यवस्थापक गुन्नापन्नु यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी संगीत्ल्र कि , जुलै 2012 ते 31 मार्च 2017 दरम्यान आरोपींच्या खराडी येथील श्रीनिवास लिव्होनिया या स्किममधील सदनिका सी 704 व डी 901फिर्यादी यांनी बुक केली होती. त्यापोटी धनादेश , डीडी व एनएफटीव्दारे 1 कोटी 53 लाख 45 हजार 603 रुपये देण्यात आले होते. आरोपींनी रजिस्टर करारनाम्याप्रमाणे सदनिकांचा ताबा वेळेत न देता कराराचा भंग केला. तसेच सदनिकेचा ताबा देण्याची मागणी वेळोवेळी केली असता वेगवेगळी कारणे सांगून ताबा देण्याचे टाळून दिलेल्या रकमेचा अपहार केला आहे. फिर्यादीकडून मिळालेली रक्कम ही बॅंकेत स्वतंत्र खाते काढून त्यावर जमा करुन ती रक्कम ज्या कारणासाठी घेण्यात आली होती, त्यासाठी न वापरता दुसऱ्या ठिकाणी वापरुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासंदर्भात सहायक पोलिस निरीक्षक ए.एम.देवकर तपास करत आहेत.