पहाटे २ वाजता आदित्य ठाकरे घटनास्थळी ..
मुंबई- कुर्ला पूर्व परिसरातील एस. जी. बर्वे मार्गावरील एसटी स्थानकाच्या मागे असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री कोसळली, तर दुसरी विंग अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांना राजावाडी रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले. तर काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चैत बसपाल (३६), संतोषकुमार गौड (२५), सुदेश गौड (२४), रामराज रहमानी (४०), संजय माझी (३५), आदित्य कुशवाह (१९), अबिद अन्सारी (२६), गोविंद भारती (३२), मुकेश मोर्य (२५) अशी जखमींची नावे आहेत. तसेच अखिलेश माझी (३६) याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजावाडी आणि शीव रुग्णालयात दाखल जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नाईक नगर परिसरातील एकमेकांना खेटून असलेल्या चार इमारती धोकादायक असल्याने पालिकेने रहिवाशांना स्थलांतर करण्याची सूचना दिली होती. मात्र रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या नव्हत्या. पडलेली इमारत त्यातीलच एक असल्याचे समजते आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रहिवाशांची सुखरुप सुटका केली.
मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नाईक नगर सोसायटीमधील डी विंग इमारत रात्री कोसळली. १२ जणांची सुटका करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. काही लोक अद्यापही अडकले असल्याची भीती आहे. इमारत जीर्ण झाली होती आणि २०१३ पासून दुरुस्तीसाठी आणि नंतर रिकामी करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या होत्या”.