उत्साहाच्या चाहुली…दिवाळी आली (लेखिका :पूर्णिमा नार्वेकर)

Date:

केवढी ही गर्दी, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, या गर्दीत कुठे येतोय करोना…दादरच्या रानडे रोडवरची तुडुंब गर्दी पाहून मनातल्या मनात मी पुटपुटले. गेल्याच आठवड्यात या रानडे रोडवर अगदी शुकशुकाट होता आणि आता पाहा, माणसांनी नुसता फुलला आहे. दिवाळीची चाहूलही लागलीय (मोती साबणाची जाहिरात सुरू झाली ना). गेल्या आठवड्यातील सुरक्षित अंतर काय ते ट्रेनमध्ये आता इंचभरही नव्हतं. ‘गर्दी’ या विषयावर व्हाट्सअपवर एक जोक फिरत होता – करोनाने बहुधा स्वतःलाच क्वारंटाईन करून घेतलं आहे १४ दिवस! खरंच की त्याचा प्रत्यय रानडे रोडवर पदोपदी येत होता. पाडव्यापासून ते दसऱ्यापर्यंत सगळे सण या करोनामुळे बंदिस्त वातावरणात पार पडले, मात्र लोकांचा संयम सुटला आणि दिवाळीच्या खरेदीसाठी हळूहळू गर्दी होऊ लागली…अर्थात मास्क लावून आणि सोबत सॅनिटायझर घेऊनच.दसऱ्यानंतर काही दिवसांनी  बाजारातील मंदी मंदावली आणि उत्साहाची झळाळी यायला लागली. ऑनलाईन दिवाळी धमाक्याचा दसऱ्यानंतरच शुभारंभ झाला होता. रांगोळी शिकविण्याच्या ऑनलाईन क्लासेसची दुकानं थाटली गेली. अमेझॉन, मिन्त्रा, फ्लिपकार्ट…दिवाळी बम्पर सेलचा धुमधडाका सुरू झाला. ज्यांना बाहेर जाऊन खरेदी करता येत नाही त्यांच्या तर पथ्यावरच पडलं. लॉकडाऊनपासून तरुण मंडळी, गृहिणी ते जेष्ठ नागरिक सर्वच टेक्नोसॅव्ही झाले आहेत. फोन घेण्या आणि करण्यापुरता मर्यादित वापर करणाऱ्या आजीबाई सुद्धा आता ऑनलाईन कुठे काय मिळते, काय काय ऑफर्स आहेत ते बघून नातीला सूचना करू लागल्या आहेत. ऑनलाईन जाहिरातबाजीला यंदा करोनामुळे सोन्याचे दिवस आले आहेत.दिवाळी फराळाच्या ऑनलाईन ऑर्डर्सचे व्हाट्सअपवर दिवसाला किमान ३-४ तरी नवीन मेसजेस येतातच. तयार भाजणी पीठ, लाडू पीठ, अनारसा पीठ, तोरण, कंदील, पणत्या…सध्या करोनाऐवजी या मेसेजेसची सर्व ग्रुपवर रेलचेल आहे. बाहेर न पडता दिवाळी साजरी करायची या अपरिहार्यतेने बहुतेकांनी आपापल्या परीनं पर्याय शोधून काढले, मग त्यात ‘साहित्य फराळ’ मागे कसा राहील. दिवाळी व दिवाळी अंक यांचं नातं अतूट आहे व त्यात खंड पडू द्यायचा नाही, यासाठी काही प्रकाशकांनी दिवाळी अंक ऑनलाईन प्रकाशित केले आहेत. सालाबादप्रमाणे पेपर स्टॉलवर दिवाळी अंक दिमाखात विराजमान झाले आहेत म्हणा. दिवाळी पहाटचे कार्यक्रम यावर्षी ऑनलाईन होणार असून सुरांची मैफल याची डोळां रंगणार आहे. दिवाळी पहाटेनिमित्त होणाऱ्या पारंपरिक वेशातील मिरवणुकीस यावेळी काट मारली गेली तरी काही जणांनी ऑनलाईन सेलिब्रेशनचा पर्याय शोधून काढलाच. प्रत्यक्ष भेटता येत नसलं म्हणून काय झालं, दरवर्षी प्रमाणे नटूनथटून परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटीगाठी होणार आहेत…त्याची जय्यत तयारीही चालू आहे. एकूण दिवाळी आणि दिवाळी पहाट युनिक पद्धतीने कशी साजरी करायची यावर  मित्रमैत्रिणींच्या तसेच फॅमिली ग्रुपमध्ये जोरदार चर्चासत्र झडते आहे. त्यास भर म्हणून ऑनलाईन खरेदीची पार्सलं कधीचीच घरी येऊन पडली आहेत.’वर्क फ्रॉम होम’मुळे कामाचा व्याप असला तरी महिलावर्ग आनंदी आहे, कारण मनासारखा दिवाळी फराळ करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नवनवीन रेसिपी बनवून तयार झालेले घरचे बल्लवाचार्य त्यांच्या दिमतीला आहेतच! बिनआवाजाचे फटाके एकच दिवस का होईना पण वाजवता येणार आहे ना, यावर घरातील बच्चे कंपनी खूष आहे. दुःखाचे, भीतीचे सावट सरून सर्वत्र उत्साहाचे दीप तेवू लागले आहेत. रानडे रोडच्या गर्दीतून वाट काढताना माणसांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा उत्साह मी न्याहाळत होते. हे चैतन्य पाहून मनोमन देवाजवळ एकच प्रार्थना केली – करोना कायमचाच आता क्वारंटाईन होऊ दे आणि आशेच्या किरणांचे दीप घरोघरी उजळू दे देवा…शुभ दीपावली.

© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकर देयकांची छपाई बँकेमार्फत; महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार

पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडील देयके, नोटीस व वॉरंट...

हडपसर गाडीतळ उड्डाणपुल दुरुस्तीस ५३.९६ कोटींचा प्रस्ताव; ‘संरचना’ कंपनीला काम देण्याची शिफारस

पुणे : हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुणे...

महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५००...