मुंबई-पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून, त्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. राऊत सध्या याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून आज (ता. 19) त्यांच्या जामीन अर्जावर तसेच कोठडीबाबतही एकत्रित सुनावणी पार पडली.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’ने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा प्रत्यक्ष सहभाग नसून त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचे ‘ईडी’ने या आरोपपत्रात नमूद केले आहे.
राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता सोमवारी राऊतांची पुढच्या रिमांड व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होईल. त्यामुळे संजय राऊत यांना दीड महिन्यानंतर आता जामीन मिळतो का? हे आज कळेल.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ‘ईडी’ आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या ते ऑर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊत यांच्यावर राजकीय सूडबुद्धी किंवा द्वेषातून कारवाई करण्यात आली नाही असे स्पष्टीकरण ‘ईडी’ने कोर्टासमोर दिले.
राऊत हे राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही असे सांगत ‘ईडी’ने जामिनाला विरोध केला
संजय राऊतांनी प्रवीण राऊतांसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केले आहे. असा युक्तिवादही ‘ईडी’ने यापूर्वी केला होता. राऊत यांच्याविरुद्ध प्रथम दोषारोपपत्र 1 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.