सोलापूर-शिवाजी पार्क म्हटल की शिवसेना हेच समीकरण आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. शिवाय कारण नसताना भाजपने संजय राऊतांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला. ते आज सोलापुरात बोलत होते.दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू असताना त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. शिंदे गटाला मेळावासाठी बीकेसीचे मैदान देण्यात आले आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आले. भाजपवाल्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले आणि आता आम्हाला सांगतायेत की, आम्ही वाऱ्यावर सोडले. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे.पुढे पत्रकारांनी अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांचा पराभव झाला मात्र, मोदींचा पराभव होणार नाही, मोदींना जनतेचा आत्मा आहे असे भाजपचे नेते म्हणतात असे विचारले. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार जनतेचा आहे. जनतेचा यावर निर्णय घेईल.