मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मंगळवारी दुपारनंतर कारवाई केली आहे. दिवसभरातील ही मोठी कारवाई असून, ईडीने त्यांची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले असून श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याबाबत माहिती दिली आहे. हे ट्विट त्यांनी संपुर्ण इंग्रजीमध्ये केले मात्र, त्यांनी साला हा शब्द जाणीवपुर्वक लिहिलेला दिसतो. घोटाळेबाजोको छोडेंगे नही असा इशारा त्यांनी ट्विटमधून दिला.
आज सकाळच्या सत्रात तपास यंत्रणांनी महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे घातले. विशेष म्हणजे ईडीच्या पथकाने मुंबईतील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील घरावर छापा टाकला. छाप्यात मुंबईतील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपचाही समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी 8 ते 9 च्या सुमारास कुर्ल्यातील गौवाला कंपाऊंडमध्ये पोहोचले आणि नवाब मलिक यांच्या घरी छापा घालून कुटुंबीयांकडून कागदपत्रे मिळवत तपास सुरू केला. या टीममध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआरपीएफची मोठी तुकडीही त्यांच्यासोबत आहे.
याच गोवा कंपाउंडजवळील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकला अटक केली होती. या जमिनीशी संबंधित व्यवहारांची अधिक माहिती मिळविण्यासाठी ईडीच्या पथकाने हा छापा टाकला आहे. ईडीच्या हाती कोणते नवे पुरावे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.