मुंबई-राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षादरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. उद्या ईडीच्या कार्यलायमध्ये हजर राहण्याचे समन्स संजय राऊत यांना बजावण्यात आले आहेत. पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळेच आधीच सत्तासंघर्षामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतही आता ईडीच्या या समन्समुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रवीण राऊत यांनी ईडीसमोर केलेल्या खुलाश्यांच्या आधारे हे समन्स बजावण्यात आलेत.
ईडीच्या नोटीसीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! शिवाय, संजय राऊत यांनी हे ट्विट थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत. ईडीने प्रवीणला पकडले, तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला ५५ लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.