पुणे- ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागृत रहावे. खरेदी करतांना वस्तुची गुणवत्ता, दर्जा तपासून घ्यावा आणि फसवणुक झाल्यास हक्कासाठी दाद मागावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले.
जागतिक ग्राहकदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वारगेट येथे आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन आज श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, वस्तू खरेदी करतांना होणारी फसवणुक टाळण्यासाठी वस्तुची किंमत, पॅकिंग, दिनांक या बाबी पाहून तपासून घ्याव्यात. खाद्यपदार्थ खरेदी करतांना वस्तुची गुणवत्ता, दर्जा तपासून घ्यावा आणि फसवणुक झाल्यास आपल्या हक्कासाठी संबंधित यंत्रणेकडे दाद मागावी.
यावेळी राज्य परिवहन पुणे विभाग नियंत्रक नितीन मैंद, एच.पी.सी.एल च्या समन्वयक अनघा गद्रे, विद्या म्हात्रे, अशोक अग्रवाल, अरुण वाघमारे, बाबा पाटील, किशोर पाटोळे तसेच प्रवासी व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.
या प्रदर्शनात वैधमापन शास्त्र यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन, राज्य आरोग्य प्रयोग शाळा, पुणे महानगर परिवहन महामंडळ, हिंदूस्थान पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेड, आरटीओ पुणे यांनी विविध प्रकारचे स्टॉल मांडले होते. या प्रदर्शनास भेट देवून असंख्य प्रवासी व नागरिकांनी माहिती घेतली.