पुणे, दि. 4 : राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, पुणे यांचे संयुक्तविद्यमाने “कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण )”अधिनियम 2013 या विषयावर दि. 3 व 4 मार्च रोजी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप आज झाला.
निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी, समीक्षा चंद्रकार यांच्या हस्ते दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्राचे उदघाटन झाले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेतील सकाळच्या सत्रात लता सोनवणे, राज्य सचिव भारतीय महिला फेडरेशन यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 च्या कायद्याविषयी विस्तृत विवेचन केले तसेच याबाबत तक्रार कशा प्रकारे करावी, कोणाकडे करावी, एनजीओ सदस्यांची भूमिका ते कशा प्रकारे मदत करु शकतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात स्थानिक तक्रार कमिटीच्या अध्यक्षा साधना खटी यांनी या कायद्याची अंमलबजावणी कशी करावी, विविधतेचा विचार करुन संवेदनशिलतेने महिलांनी कशा प्रकारे काम करायला हवे. प्रत्येक कार्यालयांमध्ये अंतर्गत निवारण समिती कशा प्रकारे काम करते, अत्याचार झाल्यास महिलांनी तक्रार कशी दाखल करावी आदि गोष्टींवर प्रकाश टाकला. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ हा देशातील महिलांबाबत केलेल्या भेदभावाचा एक भाग आहे,त्याचबरोबर महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी ती हिंसा आहे. देशातील बऱ्याच कामगार कर्मचारी महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास तोंड द्यावे लागते. यासाठी महिलांमध्ये या कायद्याबाबत जागृती होण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त पी.बी. शिर्के, जिल्हा महिला व बालविकास अधिकारीमिनाक्षी बिराजदार, संरक्षण अधिकारी सारिका पाटील, सर्व जिल्हा संरक्षण अधिकारी, तालुका संरक्षणअधिकारी, समुपदेशक, विधी स्वयंसेवक, परिविक्षा अधिकारी तसेच समाजकार्यातील विद्यार्थी, सामाजिकसंस्थेतील स्वयंसेवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.