– राज्यभर विशेष मोहिमेत 94 ठिकाणी छापे, 263 प्रकारची औषधे जप्त
मुंबई: आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून हानिकारक व आरोग्यावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांच्या बोगस जाहिरातींवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कारवाई करत सुमारे 1 कोटी 52 लाख रुपयांची 263 प्रकारची विविध औषधे जप्त केली आहेत.
मानसिक आजार, मधुमेह, लठ्ठपणा, लैंगिक कार्यक्षमता, उंची वाढविण्याचा दावा करणारे, स्त्रियांचे आजार, कॅन्सर आणि संधिवात बरा करण्याचा दावा करणाऱ्या औषधांच्या आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. या निर्देशानंतर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने विशेष मोहीम राबवित राज्यातील विविध 94 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बृहन्मुंबईतील 26 ठिकाणी छापे टाकून 67 प्रकारची औषधे जप्त केली असून कोकण विभागात 22 छाप्यात 60 प्रकारची उत्पादने, पुणे विभागातील 15 छाप्यात 15 उत्पादने, नाशिक विभागातील 11 छाप्यात 15 उत्पादने, औरंगाबादमध्ये 8 छापे व 45 उत्पादने, अमरावतीमध्ये 6 छाप्यात 13 उत्पादने, नागपूरमध्ये 6 छाप्यात 48 उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.
या छाप्यामध्ये वरील विविध आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या शुगर लॉक सिरप, अभय मेदारी स्लिम फिट कॅप्सूल, फॅटगो कॅप्सूल, व्ही-स्लिम कॅप्सूल, 303 कॅप्सूल, शुगर नाशक वटी, माय फेअर क्रीम, आरव्ही कॅप्स, डायमेडीका प्युअर आयुर्वेदिक प्रॉडक्ट, अश्वतुल-डीएक्स कॅप्सूल, लाँग हाईट एक्स्ट्रा स्ट्राँग कॅप्सूल, फॅट क्यूअर रस, लूक लाईक 16 आदी विविध प्रकारच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई करण्यात येत आहे. या कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती कायद्यात नमूद 54 आजार व व्याधी यांचे निदान करणे, हे आजार बरे करणे, व्याधी शमविणे, उपचार व प्रतिबंध करणे या विषयीच्या औषधाच्या जाहिरातीमध्ये भाग घेऊ शकत नाही. अशा प्रकारच्या जाहिरातींवर यापुढेही अन्न व औषध प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.