चित्र प्रदर्शनात साकारले 90 विद्यार्थ्यांचे कलाविष्कार !
पुणे :
‘चित्रसाधना संस्थेच्या 90 विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांचे ‘कल्लाकारी’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त कर्नल सुनील शर्मा यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ‘भीमसेन जोशी आर्ट गॅलरी’ येथे झाले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी, प्रसिद्ध कलाकार गंगादास मच्चा(सर), ‘चित्रसाधना’चे संचालक मनोज साळुंके, अनिता साळुंके, विद्या साळुंके उपस्थित होते.
‘विद्यार्थ्यांच्या कला अभिव्यक्तीचे एक मूलभूत माध्यम म्हणजे चित्रकला. कोणत्याही कलेकरिता तिच्याप्रती निष्ठा, ध्येय, प्रेम, आदर आणि नियोजन असावे. तरच ती अभ्यासपूर्णरीत्या आत्मसात करता येते. ‘चित्रसाधना’चा हा उपक्रम स्तुत्य आहे’ , असे मत निवृत्त कर्नल सुनील शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रसिद्ध कलाकार गंगादास मच्चा(सर) यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिक दाखविले. मुरली लाहोटी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे प्रदर्शनाचे दुसरे वर्ष आहे. ‘भीमसेन जोशी आर्ट गॅलरी’ (मारूतराव गायकवाड, उद्योग भवन, बे्रमन चौक, औंध गाव) येथे सोमवार दि.24 एप्रिल 2017 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन खुले राहणार आहे.
यावेळी बोलताना गंगादास मच्चा(सर) म्हणाले, ‘कले चे जीवनातील महत्व अधिक आहे. कोणतीही कला जोपासा; पण ती पुर्णत्वाला न्या.’ तसेच ‘कलेसाठी जीवन आणि जीवनासाठी कला’ याविषयी त्यांनी विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन केले.
‘कल्लाकारी’ प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून, चित्रसाधनाचे 22 वे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आयोजित फोटोग्राफी स्पर्धेतील विविध कलाकारी तसेच वस्तुचित्र, निसर्गचित्र, संकल्पचित्र, व्यक्तिचित्र, कल्पनाचित्र या प्रकारातील ‘चित्राविष्कार’ पाहायला मिळतील.