पुणे – आज सकाळी कोंढवा येथील राष्ट्रीय बँक प्रबंधक संस्थेच्या ( एनआयबीएम ) इमारतीत बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी इमारतीच्या खोलीत घुसलेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर महिलेने खोलीचे दार बाहेरुन बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन वनविभागाने ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय बँक प्रबंधक संस्थेमध्ये सकाळी सात वाजता एका महिलेला बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली होती. इमारतीच्या एका खोलीत बिबट्या लपून बसला होता. या दरम्यान महिलेने खोलीची कडी बाहेरुन बंद केली.
यामुळे बिबट्याने डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली. आक्रमक झालेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. या दरम्यान त्याने खोलीत तोडफोड केली. तीन तासानंतर बिबट्याला पकडण्यात आले.
(फोटो प्रातिनिधिक आहे )