पुणे, दि 15 ( प्रतिनिधी) – केंद्र सरकारने कामगार कायद्याद्वारे केलेल्या कामगारांच्या शोषणा संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी गोवा राज्यातील प्रमुख कामगार प्रतिनिधी सोबत लवकरच अभ्यास शिबिर घेण्यात येईल. भारतीय कामगार सेना गोव्यातील श्रमिकांच्या खंबीर पणाने पाठीशी राहून लढा देईल असा विश्वास डॉ. कुचिक यांनी यावेळी कामगारांना दिला. गोव्यातील वेरना येथील इंडिगो रेमिडिज लि. या औषध उत्पादन करणाऱ्या खाजगी उद्योगामधील बहुसंख्य कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे अधिकृत सभासदत्व स्विकारले. शिवसेना उपनेते भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, भारतीय कामग़ार सेना सहचिटणीस शुभम दिघे, प्रफुल्ल सारडा, राहुल बोहरा यावेळी उपस्थित होते
याप्रसंगी शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते भारतीय कामगार सेनेच्या कंपनीतील युनिट नामफलकाचे अनावरण करण्यात आले. डॉ. कुचिक यांनी यानंतर सभेला संबोधित केले तसेच व्यवस्थापन बरोबर बैठक घेऊन संघटनेची ध्येय धोरण, कंपनीकडून कामगारांना मिळणारी वागणूक, दबाव आदि दैनदिन विषयावर चर्चा केली. कामगारांच्या समस्यांसंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापन सोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येईल आणि त्यामध्ये कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात सखोल चर्चा आणि तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही डॉ. कुचिक यांनी यावेळी दिली.
या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापन प्रतिनिधि अरविंद प्रभु, रुषल, करुणाकर, यूनिट अध्यक्ष प्रशांत नाईक, सरचिटणीस सर्वेश तळेकर, प्रतिनिधि अप्पा गुरव, राघवेंद्र पवार, भारतीय कामगार सेनेचे गोवा राज्य मुख्य संघटक शंकर पंडित, विनायक सहभागी झाले होते. बैठकीनंतर डॉ. कुचिक यांनी वेरना औंधोगिक परिसरातिल कारखान्यांचा दौरा केला. त्यांनी कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोनाच्या बिकट स्थितीत कामगारांना आलेल्या अडचणींविषयी चर्चा केली.
केंद्र सरकारने कामगार कायद्याद्वारे केलेल्या कामगारांच्या शोषणा संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी गोवा राज्यातील प्रमुख कामगार प्रतिनिधी सोबत लवकरच अभ्यास शिबिर घेण्यात येईल असेही डॉ. कुचिक यांनी यावेळी सांगितले.