परभणी-मागील पंधरा वर्षापासून हरियाणा आणि महाराष्ट्र यांची निवडणूक सोबत होत होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर होणार नाही. माननीय निवडणूक आयोगाने पाऊस, पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी अशी कितीही कारणे दिली तरी सरकारची धाकधूक – धाकधूक व्हायला लागली आहे. म्हणूनच निवडणूक पुढे ढकली असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. असे म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर मध्ये होत होती. मात्र ती नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्राची जनता नापास होणार आहे, हे त्यांच्या मुलाला कळाले आहे. त्यामुळेच ते आता दिल्लीतील पिताश्रींना निवडणूक आयोगाला कोणताही नियम वापरून निवडणूक पुढे ढकलण्याचे सांगत असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. मुलाचा अभ्यास झाला नव्हता त्यामुळे मुलगा परीक्षेत नापास होईल की काय? अशी भीती वाटत असल्यामुळे बापाने परीक्षा पुढे ढकलली, अशा शब्दाचा अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सध्या राज्यांमध्ये शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मध्ये आयोजित सभेत अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे उदाहरण देत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.