मुंबई – मनसेच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने अमित राज ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग करण्यात आले आहे. त्यांना मनसेच्या नेते पदी अधिकृतरित्या निवडण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीतच त्यांना राजकारणात आणण्याचा विचार होता. परंतु, गंभीर आजारामुळे तो कार्यक्रम टाळण्यात आला. परंतु, 23 जानेवारी रोजीच्या महाअधिवेशनाच्या दिवशी त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी आपल्या भाषणात बोलताना वडील राज ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच नेतेपदी निवड होणार अशी माहिती दिल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी आपल्या वडिलांसह कुटुंबियांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
अमित ठाकरे यांचे राजकारणात पदार्पण होताच त्यांची तुलना आदित्य ठाकरे यांच्याशी केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2010 मध्ये शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांची राजकीय एंट्री करण्यात आली. यावेळी त्यांना युवा सेनेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. गेल्या 8 वर्षांत विविध पदांवर असताना त्यांनी 2019 मध्ये आमदारकीसाठी निवडणूक लढवली. तसेच 2020 च्या महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे, ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे ते पहिले आणि एकमेव सदस्य आहेत. आता अमित ठाकरे यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल आणि त्यांना पक्षात कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.