पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परबांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. गृहमंत्री शहांना पाठविलेल्या पत्रात,’ भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत आहोत’ असे पाटलांनी म्हटले आहे. अचानक चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा उसळली आहे.
भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये हा ठराव संमत केला होता. यामध्ये अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी असा ठराव होता. आता चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शहांना यासंदर्भात इंग्रजी भाषेतून पत्र पाठविले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर सचिन वाझे याच्या पत्रामध्ये वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करण्यात यावी असे चंद्रकांत पाटलांनी निवेदनात म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहे. सचिन वाझे याला २००४ सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या माध्यमातून त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसंच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितलं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझे याने चौकशीत उघड केलं आहे, असंही या पत्रात लिहिलेलं आहे. सचिन वाझेने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने अजित पवार आणि अनिल परब यांनी आपल्याला वसुली करण्यास सांगितलं अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या दोघांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
भाजपने पास केलेल्या ठरावात काय म्हटले आहे?
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले, मात्र कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपी बनवण्याचे काम महाविकास आघाडीकडून केले जात असल्याचे या ठरावात म्हटले होते. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावरही बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने वसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी केली जात आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करण्यात यावी असे भाजपच्या कार्यकारीणीने ठरावात म्हटले होते.