‘यांच्या राजकारणामुळे सोन्यासारखा माणूस गमावला’; रोहित पवार पक्षात एकटे पडल्याचाही दावा
मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात वेगवेगळे मतप्रवाह समोर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आता जर एनडीएमध्ये जाण्याची धडपड सुरू असेल, तर अजितदादा हयात असताना त्यांना एवढा त्रास का दिला, असा थेट सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मिटकरी यांनी शरद पवार गटाच्या संभाव्य राजकीय भूमिकेवर भाष्य केले. शरद पवार हे काळाची गरज ओळखून आपल्या भूमिकेत बदल करत असतात. परिसीमन विधेयकाबाबत शरद पवार यांनी स्वतः अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. सुप्रिया सुळे यांनी अनुकूलता दर्शविली आहे, जितेंद्र आव्हाड पाठिंब्याबाबत बोलत आहेत, तर रोहित पवार यांची भूमिका वेगळी असल्याचे मिटकरी म्हणाले.
दादांना वेळोवेळी तोंडावर पाडले!
अजित पवार यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करून सत्तेत सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. सर्वांनी सत्तेत जाऊ असे सांगितले; मात्र त्यानंतर अजितदादांना वेळोवेळी तोंडावर पाडण्यात आले. यांच्या राजकारणामुळे आपण सोन्यासारखा माणूस गमावला, अशी खंत मिटकरी यांनी व्यक्त केली.
आज एनडीएसोबत जाण्याची तयारी दिसत असेल, तर त्यावेळी अजितदादांना विरोध का करण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
परिसीमनाबाबत शरद पवार गटाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात
परिसीमन विधेयकाला शरद पवार यांच्या पक्षाचा नेमका पाठिंबा आहे की नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सध्याच्या घडामोडींवरून शरद पवार यांचा पक्ष एनडीएच्या जवळ जात असल्याचे दिसते, असा दावा मिटकरी यांनी केला.
रोहित पवार पक्षात एकटे पडले आहेत!
आमदार रोहित पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, असे मतही मिटकरी यांनी व्यक्त केले. रोहित पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलने केली आहेत. अशा परिस्थितीत एनडीएसोबत गेल्यास तरुणांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि त्यांच्या राजकीय प्रतिमेलाही धक्का बसू शकतो. त्यामुळेच त्यांनी समाजमाध्यमांवर वेगळी भूमिका मांडली असावी, असे मिटकरी म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीत रोहित पवार हे आपल्या पक्षात एकटे पडले असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात, असे भाकीतही मिटकरी यांनी केले.
परिसीमन विधेयकाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकीय मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, शरद पवार यांच्या पक्षाच्या अंतिम भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

