निवडणुकीचा नकाशा बदलून,८५० हा आकडा भारतीय लोकशाही नष्ट करेल!’

Date:

‘८५० हा आकडा लक्षात ठेवा, तो भारतीय लोकशाही नष्ट करेल’; परिसीमन विधेयकावरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल!

निवडणुकीचा नकाशा बदलून राजकीय फायदा मिळविण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप; ‘मी घाबरत नाही, देशातील तरुण पिढी माझ्यासोबत आहे’

नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघांच्या प्रस्तावित पुनर्रचनेवरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. लोकसभेच्या जागांची संख्या ५४३ वरून ८५० करण्यामागे देशाचा निवडणूक नकाशा बदलून भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्याचा उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला.

‘८५० हा केवळ आकडा नाही, तर भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न आहे,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

महिला आरक्षणासाठी ८५० जागांची गरज काय?

महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच मंजूर झाले आहे. त्यामुळे सध्याच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करता येऊ शकते. असे असताना लोकसभेच्या जागांची संख्या ८५० करण्याचा आग्रह का धरला जात आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

महिला आरक्षणाला विरोध नसून, त्याच्या नावाखाली मतदारसंघांची पुनर्रचना करून भाजपला अनुकूल निवडणूक व्यवस्था निर्माण करण्याच्या कथित प्रयत्नांना विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव असल्याचा आरोप

लोकसभेच्या जागांची संख्या वाढविल्यानंतर मतदारसंघांच्या सीमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची संधी निर्माण होईल. त्यातून भाजपला विरोध करणाऱ्या समुदायांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा तसेच प्रमुख विरोधी नेत्यांच्या मतदारसंघांची रचना बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

यासाठी त्यांनी आसाम आणि जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघ पुनर्रचनेचे उदाहरण दिले. देशाचा संपूर्ण निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

परिसीमन आयोगाच्या रचनेवरही प्रश्नचिन्ह

प्रस्तावित परिसीमन आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. आयोगाच्या रचनेमुळे मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्याच्या प्रक्रियेवर केंद्र सरकारचा प्रभाव वाढू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्यासंदर्भातील काही माहिती काँग्रेसकडे असून, ती लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

‘मी भाजपला घाबरत नाही; जेन-झी माझ्यासोबत’

देशातील निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देत देशातील मोठ्या प्रमाणातील नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला निवडणूक प्रक्रियेबाबत संशय असल्याचा दावा त्यांनी केला.

अनेकांना भाजपची भीती वाटते; मात्र आपण घाबरत नाही. देशावर प्रेम असल्यामुळे प्रश्न विचारत राहणार असून, भारतमाता आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

इंडिया आघाडीसह सत्ताधाऱ्यांच्या मित्रपक्षांनाही आवाहन

हा प्रश्न केवळ इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा नसून संपूर्ण देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि जगन मोहन रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांनीही प्रस्तावित विधेयकाचा गांभीर्याने विचार करावा, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभेच्या ५४३ जागा पुरेशा असून, जातनिहाय जनगणनेला प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.

मतदार यादीतील बदलांवरून निवडणूक आयोगाला सवाल

मतदार याद्यांमधील मोठ्या प्रमाणावरील बदलांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी २०२४ च्या निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले. मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या आणि त्यामागील कारणांबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

पश्चिम बंगालसह विविध राज्यांमधील निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे आरोपही त्यांनी केले.

आता कोण कुठे मतदान करणार, हेही मोदी-शहा ठरवणार का? – खरगे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही प्रस्तावित परिसीमन विधेयकावर जोरदार टीका केली आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) माध्यमातून कोण मतदान करणार, हे ठरविण्याचा प्रयत्न झाला आणि आता परिसीमनाच्या माध्यमातून कोण कुठे मतदान करणार, हे ठरविले जाणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वात वाढ करण्याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही खरगे यांनी केली. परिसीमनाच्या माध्यमातून संसदेतील संख्याबळ वाढवून संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत काँग्रेस या विधेयकाला विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संसदेतील संघर्षासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची तयारी

परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित प्रस्तावांवर संसदेच्या आगामी बैठकीत चर्चा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या खासदारांसाठी पक्षादेश (व्हिप) जारी केला आहे. खासदारांना २९ नोव्हेंबरपर्यंत नवी दिल्लीत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही आपल्या खासदारांना संसदेच्या विशेष बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

परिसीमन विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, आगामी संसदीय कामकाजाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मसापमध्ये सत्तासंघर्ष; योगेश सोमण यांच्याविरोधात २० विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर केल्याची घोषणा!

सुनील महाजन यांची अध्यक्षपदी निवड; शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी...

महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईचा आजचा आकडा साडेतीन लाख चौरस फुटांपार!

डीपी रोडवरील सर्वाधिक २ लाख ३९ हजार चौरस फुटांवरील...

कामात हयगय कराल तर अधिकाऱ्यांवरही कारवाई; महापालिका आयुक्तांचा थेट इशारा!

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश; धार्मिक स्थळांशी संबंधित प्रश्नांसाठी...

मसापमध्ये नेतृत्वबदलाचे वारे; अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा दावा!

कार्यकारी मंडळाच्या २१ सदस्यांनी दाखल केला होता अविश्वास ठराव;...