५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनयाचा गौरव; सन्मानचिन्हासह १५ लाख रुपयांचे पारितोषिक
गोवा : भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आणि चित्रपट निर्माता ऋषभ शेट्टी याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा प्रतिष्ठेचा रजत मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ऋषभ शेट्टीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार तसेच चित्रपट महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.
ऋषभ शेट्टीच्या अभिनयाने आंतरराष्ट्रीय परीक्षकही भारावले
ऋषभ शेट्टीच्या सशक्त अभिनयाची, भावनिक अभिव्यक्तीची आणि व्यक्तिरेखेशी पूर्णपणे समरस होण्याच्या क्षमतेची आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाने विशेष दखल घेतली.
ऋषभ शेट्टी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना विविध भावनांच्या प्रवासात सहभागी करून घेतो. त्याची संपूर्ण देहबोली चित्रपटाच्या कथेशी एकरूप होते. त्याने स्वतःला व्यक्तिरेखेत पूर्णपणे झोकून दिले असून, त्याची कामगिरी केवळ अभिनयापुरती मर्यादित न राहता एक विलक्षण अनुभव ठरते, अशा शब्दांत परीक्षकांनी त्याचे कौतुक केले.
रजत मयूरसह १५ लाखांचे पारितोषिक
चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार प्रदान केला जातो. रजत मयूर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रद्धा, संघर्ष आणि न्यायाची कहाणी सांगणारा ‘कांतारा’
कदंब राजवटीच्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ हा चित्रपट एका गूढ जंगलातील संघर्षाची कहाणी सांगतो.
बंगरा राज्याचा राजा विजयेंद्र याचा जंगलात मृत्यू झाल्यानंतर त्याचा वारसदार राजशेखर राज्याच्या सीमा बंद करतो. काही वर्षांनंतर जंगलात राहणारा बर्मे या सीमा ओलांडून राज्यात प्रवेश करतो. तेथील जुलमी राजवटीविरोधात आणि आदिवासी समुदायाच्या रक्षणासाठी तो संघर्ष उभारतो.
श्रद्धा, परंपरा, न्याय, धर्म आणि नियती यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयावर आता आंतरराष्ट्रीय परीक्षकांनीही गौरवाची मोहोर उमटविली आहे.

