सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार रस्ते सुरक्षेसाठी अंदाजपत्रकातील एक टक्का निधी राखीव ठेवणे बंधनकारक; शासन परिपत्रकाच्या अंमलबजावणीचा मागितला लेखाजोखा
पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम सुरू केली असतानाच, पादचारी सुरक्षेसंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांची महापालिकेकडून कितपत अंमलबजावणी करण्यात आली आहे, असा सवाल महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देत सविस्तर माहिती आणि संबंधित कागदपत्रांची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पादचारी सुरक्षेसंदर्भात दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकाला वर्ष उलटून गेले असून, पुणे महानगरपालिकेने त्यातील तरतुदींची कितपत अंमलबजावणी केली, याची माहिती निकम यांनी मागितली आहे.
केवळ अतिक्रमणे हटवून चालणार नाही; पादचाऱ्यांना सुरक्षित पदपथ मिळाले पाहिजेत!
सध्या पुणे शहरात विविध ठिकाणी पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू आहे. मात्र, ही मोहीम केवळ अतिक्रमणे हटविण्यापुरती मर्यादित न राहता पादचाऱ्यांना सुरक्षित, सलग आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासन परिपत्रकातील सर्व तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे निकम यांनी पत्रात नमूद केले आहे.
दर सहा महिन्यांनी पदपथांचे लेखापरीक्षण; पुण्यात किती वेळा झाले?
शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व महानगरपालिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत लेखापरीक्षण संस्थांकडून आपल्या क्षेत्रातील पदपथांचे दर सहा महिन्यांनी सर्वंकष लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे.
बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, बस आणि रेल्वे स्थानके, पर्यटनस्थळे तसेच गर्दीच्या ठिकाणांना यामध्ये प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. लेखापरीक्षण अहवालासह पदपथांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कृती आराखडा नगरविकास विभागाकडे सादर करणेही आवश्यक आहे.
पुणे शहरात असे लेखापरीक्षण करण्यात आले आहे का? संबंधित संस्थेचे नाव काय? त्यासाठी किती खर्च झाला? कोणकोणत्या भागांतील पदपथांची तपासणी करण्यात आली? लेखापरीक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे का? अशी विचारणा निकम यांनी केली आहे.
अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत, यासाठी काय उपाययोजना केल्या?
पदपथ आणि पादचारी मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे का? त्यानुसार आजवर किती ठिकाणी कारवाई करण्यात आली? कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची क्षेत्रीय कार्यालयनिहाय माहितीही मागविण्यात आली आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे १५ दिवसांत निराकरण बंधनकारक!
शासन परिपत्रकानुसार पदपथांवरील अतिक्रमणे, तुटलेले पदपथ आणि पादचारी सुविधांमधील अडथळ्यांबाबत नागरिकांना ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
प्राप्त तक्रारींचे १५ दिवसांच्या आत निराकरण करणे बंधनकारक असून, विलंब झाल्यास संबंधित तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्वयंचलितरीत्या वर्ग करण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर निकम यांनी पुढील माहिती मागितली आहे.
- शासन परिपत्रक जारी झाल्यापासून किती तक्रारी प्राप्त झाल्या?
- किती तक्रारींचे १५ दिवसांच्या आत निराकरण करण्यात आले?
- सध्या किती तक्रारी प्रलंबित आहेत?
- तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सरासरी किती दिवस लागतात?
- निर्धारित मुदतीत तक्रारींचे निराकरण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करण्यात आली आहे का?
- नागरिकांना आपल्या तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येते का?
रस्ते सुरक्षेसाठी अंदाजपत्रकातील एक टक्का निधी राखीव ठेवला का?
राज्य शासनाने सर्व महानगरपालिकांना त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकातील किमान एक टक्का निधी रस्ते सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि जनजागृतीसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करून खर्च करण्याचेही बंधन आहे.
पुणे महानगरपालिकेने या निर्देशानुसार निधीची तरतूद केली आहे का? स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले आहे का? पदपथांची दुरुस्ती, पादचारी सुरक्षा आणि अडथळामुक्त मार्गांसाठी आजवर किती निधी खर्च करण्यात आला, याचा लेखाजोखा निकम यांनी मागितला आहे.
शासनाच्या परिपत्रकात पादचारी सुरक्षेसाठी १४ महत्त्वपूर्ण निर्देश
१० नोव्हेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात पुढील उपाययोजना स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
१. रस्ते सुरक्षा आणि जनजागृतीसाठी अंदाजपत्रकातील किमान एक टक्का निधी राखीव ठेवणे.
२. दर सहा महिन्यांनी पदपथांचे सर्वंकष लेखापरीक्षण आणि आवश्यक सुधारणा.
३. पादचारी क्रॉसिंग, झेब्रा मार्किंग, परावर्तक चिन्हे आणि पादचारी सिग्नलची व्यवस्था.
४. पदपथ आणि पादचारी मार्गांवरील अतिक्रमणांचे निर्मूलन.
५. पादचारी पूल आणि भुयारी मार्गांवरील प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी.
६. अनधिकृत रस्ता ओलांडणे टाळण्यासाठी रेलिंग, बॅरियर्स आणि दुभाजकांची व्यवस्था.
७. प्रत्येक महानगरपालिकेत स्वतंत्र प्रवेशयोग्यता व पादचारी कक्षाची स्थापना.
८. अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना.
९. बस, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर सुलभ प्रवेश, सावलीयुक्त प्रतीक्षा क्षेत्रे आणि स्पर्शीय फरशीची व्यवस्था.
१०. दरवर्षी शहरातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी किमान २० टक्के लांबीचे पादचारी क्रॉसिंगच्या आवश्यकतेसाठी मूल्यांकन.
११. स्वयंचलित कॅमेरे, संकेतफलक आणि रंबल स्ट्रिप्सच्या माध्यमातून वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी.
१२. शहरी रस्त्यांच्या डिझाइन, बांधकाम आणि देखभाल मानकांचे पालन.
१३. सायकल, रिक्षा आणि पादचारी वाहतुकीचे सुरक्षित सहअस्तित्व सुनिश्चित करणे.
१४. ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा आणि १५ दिवसांत तक्रारींचे निराकरण.
अतिक्रमणमुक्त पुण्यासोबत पादचारीस्नेही पुणे कधी?
महापालिकेकडून सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे. मात्र, अतिक्रमणे हटविल्यानंतर पदपथांची दुरुस्ती, त्यांचे सातत्यपूर्ण संरक्षण, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा आणि नागरिकांना सुरक्षितपणे चालता येईल अशी व्यवस्था निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
शासन परिपत्रकातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन पुणे शहरातील सर्व पदपथ सुरक्षित, अतिक्रमणमुक्त आणि अडथळामुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या पत्राची प्रत महापालिकेच्या पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनाही देण्यात आली आहे.

