४२ व्या पोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस उत्साहात; मैदानी आणि सांघिक खेळांमध्ये दमदार कामगिरी
पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ४२ व्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पोलीस खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचे शानदार प्रदर्शन केले. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दोन्ही आयुक्तालयांच्या खेळाडूंमध्ये रंगतदार चुरस पाहायला मिळाली.
२३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मंगळवारी ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, खो-खो, हँडबॉल, हॉकी, बास्केटबॉल, वेटलिफ्टिंग आणि ज्युदो या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा पार पडल्या.
मैदानी स्पर्धांमध्ये महिला पोलिसांची दमदार कामगिरी
महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या कोमल राठोड यांनी २५.५९ मीटर अंतरावर थाळी फेकून प्रथम क्रमांक पटकावला. भालाफेक स्पर्धेत अनिता जारवाल यांनी २७.८२ मीटर अंतराची नोंद करत प्रथम स्थान मिळविले.
महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या निकिता खताळ यांनी ३०.३८ सेकंदांत अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. तर ४०० मीटर अडथळा शर्यतीत पुणे शहरच्या पद्मा कारंडे यांनी बाजी मारली.
पुरुषांच्या मैदानी स्पर्धेतही रंगली चुरस
पुरुषांच्या थाळीफेकीत हरिराम डुमनर यांनी २९.५० मीटर, तर हॅमर थ्रोमध्ये दीपक ठाकरे यांनी ३७.३२ मीटर अंतराची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावला.
भालाफेकीत ओमकार डांगले यांनी ४५.४२ मीटर अंतराची नोंद केली. तिहेरी उडीत शरद मुसळे यांनी ११.४९ मीटर, तर लांब उडीत शुभम दांडगे यांनी ६.१६ मीटर अंतराची नोंद करत प्रथम स्थान मिळविले. पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत शाहरुख शेख यांनी २४.७६ सेकंदांत अंतर पूर्ण करून बाजी मारली.
सांघिक स्पर्धांमध्ये पुणे पोलिसांचे तीन विजय
- हँडबॉल : पुणे शहर पोलीस मुख्यालयाचा १९-१६ असा विजय.
- हॉकी : पुणे शहर पोलीस मुख्यालयाचा ४-३ असा विजय.
- व्हॉलीबॉल : पुणे शहर पोलीस मुख्यालय विजयी.
- बास्केटबॉल : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा ४२-३४ असा विजय.
- खो-खो : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय विजयी.
महिला वेटलिफ्टिंगमध्ये पिंपरी-चिंचवडचे वर्चस्व
महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेतील सहापैकी पाच वजनगटांत पिंपरी-चिंचवडच्या महिला पोलीस खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळविला. जयश्री इंगळे, पूजा सोनवणे, मयुरी आवारे, अर्चना राणे आणि युगंधरा औसरमल यांनी आपापल्या वजनगटांत बाजी मारली. पुणे शहरच्या राजश्री कम्पदाणी यांनी ७७ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला.
ज्युदो स्पर्धेतही दोन्ही पोलीस आयुक्तालयांच्या महिला आणि पुरुष खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
दैनंदिन कर्तव्याच्या धावपळीतून वेळ काढत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मैदानावर दाखविलेला उत्साह, शारीरिक क्षमता आणि संघभावना या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.
बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे.

