विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागातून दीपोत्सव; समाधी स्थळाच्या संवर्धनाचा संकल्प
पुणे : दिवाळीच्या निमित्ताने शेकडो पणत्यांच्या प्रकाशात भवानी पेठेतील छत्रपती शहाजीराजे प्रतापसिंह भोसले ऊर्फ जंगली महाराज यांच्या दुर्लक्षित समाधीस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. ऐतिहासिक वारसा आणि स्मृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित या दीपोत्सवामुळे समाधी परिसर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत छत्रपती घराण्याचे वंशज श्रीमंत छत्रपती शहाजीराजे प्रतापसिंह भोसले ऊर्फ जंगली महाराज यांची समाधी भवानी पेठेतील वॉचमेकर चाळ परिसरात, चंदन मेडिकलच्या मागे आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे ऐतिहासिक योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, हा ऐतिहासिक वारसा आणि समाधीस्थळ आजही दुर्लक्षित असल्याने त्याचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भवानी पेठ विभाग, पतित पावन संघटना, श्री रामनवमी उत्सव समिती, समस्त हिंदू आघाडी, पुण्येश्वर पुनर्निर्माण समिती, विश्व हिंदू परिषद, जिथे कमी तिथे आम्ही, वीर लहुजी परिषद, भगवे ट्रेकर्स, श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी साप्ताहिक पूजा सेवेकरी, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे स्मारक सेवेकरी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान पुणे शहर, श्री देवदेवेश्वर संस्थान, स्वस्तिक फाउंडेशन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि सारसबाग शिववंदना ग्रुप आदी संस्थांनी सहभाग घेतला.
यावेळी इतिहास अभ्यासक मोहनजी शेटे, जगन्नाथ लडकत, नरेंद्र मेढेकर गुरुजी, मिलिंद भाऊ एकबोटे, महंत धुमाळ गुरुजी, तुषार पाटील आणि सर्वेश मेहेंदळे उपस्थित होते.
या दीपोत्सवाचे आयोजन छत्रपती शहाजीराजे भोसले ऊर्फ छत्रपती जंगली महाराज समाधी संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले. अक्षय राऊत, संतोष डिंबळे, अनंत वांजळे , ऋषिकेश पवार, गुलाब साळुंके, तुषार धानीपकर, मिहिर साल्पेकर आणि तनेश नहार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

