“प्रेमाचे साइड इफेक्ट्स” चित्रपटातून झळकणार पृथ्वीक कांबळे
मराठी सिनेमा कात टाकत आहे याबद्दल आता काही शंकाच उरली नाही. काळासोबत पुढे जात असताना नवनवीन प्रयोग मराठीतील अनेक जण अवलंबताना दिसतात आणि म्हणूनच आता मराठी इंडस्ट्री ला अनेक नवीन चेहरे मिळत आहेत. प्रथमेश परब सरखा सुपरहिट चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाल्या नंतर आता लवकरच याच नवीन चेहऱ्यांमध्ये पृथ्वीक कांबळे हे नाव देखील जोडलं जाणार आहे.
पृथ्वीक कांबळे हा आगामी प्रदर्शित होणा-या ‘प्रेमाचे साईड इफेक्ट्स’ या सिनेमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पृथ्वीक सोबत आणखी एक नवीन चेहरा झळकणार आहे तो म्हणजे ईश्वरी देशपांडे. या दोन्ही कलाकारांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात दीपक शिर्के, रवि काळे, किशोरी अंबिये, सुप्रिया पाठारे अशी दिग्गज आणि तगडी कलाकार मंडळी सुद्धा आहेत. या सिनेमाची निर्मिती “ईश्वरी प्रोडक्शन” या बॅनर खाली जयश्री देशपांडे यांनी केली आहे. सिनेमाचे लेखन अभिजित हरिश्चंद्र यांनी केले असून याचे दिग्दर्शन सुनील चौथमल यांनी केले आहे.
पृथ्वीक ने या आधी अनेक एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर ठेवली आहे. या सिनेमा द्वारे पृथ्वीक प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या आधीही नाईट स्कूल, प्यार वाली लव्ह स्टोरी अशा मोठ्या सिनेमात त्याने छोटे छोटे रोल्स देखील केले आहेत.
कीर्ति कॉलेज मधून जनमाध्यम म्हणजेच BMM ची पदवी घेतलेला पृथ्वीक हा सध्या सोशल मीडिया एक्सिक्युटीव म्हणून जॉब सुद्धा करत आहे. त्याच्या या स्ट्रगलमध्ये त्याला संजय जाधव आणि दीपक राणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन हि मिळाले आहे.
शाहरुख खान आणि नावाजुद्दिन सिद्दकी यांना आपला आदर्श मानत असलेल्या पृथ्वीक ला पुढे अभिनयातच करिअर करायचं आहे आणि त्याच दृष्टीने तो पाऊले हि उचलत आहे. प्रेमाचे साईड इफेक्ट्स या सिनेमानंतर ‘ऑनलाईन’ या द्विभाषी (हिंदी-मराठी) सिनेमात सुद्धा पृथ्वीक हिरो म्हणून झळकणार आहे. त्यामुळे मराठी सिनेमाला नवं स्वरूप मिळत असतानाच नवीन कलाकारांसोबत नवीन कलागुण सुद्धा आपल्याला पृथ्वीक आणि ईश्वरी च्या रुपात लवकरच पाहायला मिळतील.