पुणेकरांना अपेक्षित असाच गणेशोत्सव करू : मुरलीधर मोहोळ

Date:

गणेशोत्सव हा पुणेकरांचा लोकोत्सव; लोकसहभाग अधिक व्यापक करण्याची ग्वाही

  • ‘गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन
  • पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सव परंपरेचा टपाल विभागाकडून गौरव

पुणे : “पुण्याचा गणेशोत्सव हा कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा विषय असला, तरी मुळात हा उत्सव पुणेकरांचा आहे. गणेशोत्सव आणि लोकसहभाग या वेगळ्या गोष्टी असूच शकत नाहीत. त्यामुळे पुणेकरांना अभिप्रेत आणि अपेक्षित असाच गणेशोत्सव साजरा केला जाईल. सर्वसामान्य पुणेकरांचा सहभाग अधिकाधिक वाढवून हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘लोकोत्सव’ म्हणून अधिक व्यापक करू,” अशी ग्वाही केंद्रीय सहकारिता आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून दिली.

टपाल विभागातर्फे पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे सोमवारी (२१ सप्टेंबर) आयोजित कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. यावेळी ‘गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ या विषयावरील विशेष टपाल आवरणाचे मोहोळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुण्याच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेशोत्सव परंपरेची नोंद टपालाच्या माध्यमातून देशभर पोहोचविण्याच्या उद्देशाने मोहोळ यांनी ही संकल्पना पोस्ट खात्याकडे मांडली होती. यावेळी आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, टपाल विभागाच्या महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल, टपाल सेवा संचालक अभिजित बनसोडे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, “लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला समाजजागृती आणि लोकसंघटनाचे प्रभावी माध्यम बनवले. अनेक पिढ्यांनी या उत्सवातील स्थित्यंतरे पाहिली आहेत. काळानुसार स्वरूप बदलले असले, तरी पुण्याच्या गणेशोत्सवाचा मूळ आत्मा लोकसहभाग हाच आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते या परंपरेचे वाहक आहेत आणि त्यांना या उत्सवाचा निश्चितच अभिमान आहे; मात्र हा उत्सव केवळ मंडळांचा किंवा कार्यकर्त्यांचा नसून संपूर्ण पुणेकरांचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला हा उत्सव आपला वाटला पाहिजे. हीच पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची खरी ताकद आहे.”

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देऊन या परंपरेचा राज्यपातळीवर गौरव केला आहे. त्यासाठी विधिमंडळात मागणी करणारे आमदार हेमंत रासने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे मोहोळ यांनी अभिनंदन केले. “राज्यपातळीवरील सन्मानानंतर आता विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा देशपातळीवर पोहोचत आहे. आपल्या वैभवशाली परंपरेचे जतन करत ती अधिक समृद्ध करणे आणि जगभर पोहोचविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे मोहोळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकास आणि विरासत’ या भूमिकेचा उल्लेख करत मोहोळ म्हणाले की, “२०४७ पर्यंत विकसित भारत घडविताना विकासासोबत आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतनही तितकेच महत्त्वाचे आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा आपल्या समृद्ध सांस्कृतिक विरासतीचा महत्त्वाचा भाग आहे. या परंपरेचे जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे.”

गणेशोत्सवाच्या टपाल तिकिटासाठी महापालिकेने ठराव करावा

पुण्याच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक नोंद अधिक व्यापक स्वरूपात कायमस्वरूपी जतन व्हावी, यासाठी गणेशोत्सवाचे स्वतंत्र टपाल तिकीट प्रकाशित करण्याची अपेक्षाही मोहोळ यांनी व्यक्त केली. “आज विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन झाले आहे. आता पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या स्वतंत्र टपाल तिकिटासाठी ठराव करावा. महापौरांनी पुढाकार घेऊन टपाल विभागाकडे त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढील वर्षापर्यंत पुण्याच्या गणेशोत्सवाचे स्वतंत्र टपाल तिकीट प्रकाशित व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे,” असे मोहोळ म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव

संगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर पुणे...

IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा,...

मिरवणुकीचा खर्च टाळला; गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला निधी

शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाचा आदर्श गणेशोत्सव; उर्वरित...

‘रेंट अ गरबा पार्टनर’वर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारकडे चौकशीची मागणी

गरब्यासाठी पैशांवर पार्टनर देणाऱ्या जाहिरातींवर बंदी घाला; जाहिरातींमागील रॅकेटची...