पुणे-‘सोन्याची जेजुरी ,रुपयाची पायरी … असे म्हणतात .. भंडारा उधळल्याने तमाम जेजुरीला सोन्याचं रूप प्राप्त होतं. आता या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिराचा कळस सोन्याचा करण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. जेजुरीत येणाऱ्या भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारापासून हा कळस तयार केला जात आहे. त्यासाठी जवळपास दीड किलो शुद्ध सोने वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पुरातन काळापासून सोन्याची जेजुरी म्हणून प्रचलित असलेले नाव सार्थ हाताना दिसत असून त्याची सुरुवात मुख्य मंदिराच्या कळसापासून करण्यात येत आहे.
जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला राज्यातील तसेच देशभरातील भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. भक्तांनी देणगीच्या रुपात, नवसपूर्तीसाठी, श्रद्धेने अर्पण केलेल्या आणि देवसंस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध दागदागिने आणि वस्तूंमधून खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस सोन्याचा बनवण्यात येत आहे. यासाठी सुमारे दीड किलोपर्यंत शुद्ध सोने वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या सुवर्ण कळसाचे काम करण्यासाठी राजस्थानहून कुशल कारागीर बोलविण्यात आले आहेत. सुवर्ण कळसाचे काम आठवडाभर इन कॅमेरा चालणार आहे. गेल्या कित्तेक वर्षांपासून भाविक आणि जेजूरीवासीय खंडेरायाच्या मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्याची मागणी करीत होते. येत्या काही दिवसांवर आलेली सोमवती यात्रा व त्यानंतर नवरात्र व दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी सुवर्ण कळशाचे काम पूर्ण करण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस आहे.