( डाव्या बाजूला संग्राहय असे फोटो आणि उजव्या बाजूला बाजीराव दांगट यांचे आपल्या मुलांसमवेतचे छायाचित्र)
काल दिवसभर विविध वृत्त वाहिन्यावर व आज विविध वृत्तपत्रात राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर ;सेना आणि मनसे यांनी या विधानसभा निवडणुकीत एकत्र यावे या संदर्भात घडलेला वृत्तांत सांगताना ज्या बाजीराव दांगट यांचा नामोल्लेख राज ठाकरे यांनी केला ते बाजीराव दांगट कोण ? असा प्रश्न अनेक लोकांना पडला असेल . आपल्या हयातीत दोन भावांनी वेगळे लढू नये अशी भावना स्व. बाळासाहेब ठाकरे यांची असताना आपल्या पित्यासमान काकांचे न ऐकणारे राज यांनी या बाजीराव दांगट यांचा प्रस्ताव स्वीकारला म्हणजे ती कोणीतरी पावरफुल व्यक्ती असेल अशी अनेकांची समजूत झाली असेल . वास्तव मात्र वेगळेच आहे … हि व्यक्ती तुमची आमच्या सारखी सर्वसामान्य आहे .
कोण आहेत बाजीराव
आपण मार्मिक वाचले किंवा पाहिले तरी असेल . मराठी माणसासाठी शिवसेना नावाची संघटना उभी करण्यासाठी व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते तरी प्रभावी माध्यम आपल्याकडे असावे असे बाळासाहेबांना वाटे . त्यात ते हाडाचे व्यंगचित्रकार असल्याने आपली कला आपल्यासाठी स्वतः साठी वापरता येऊ शकते,त्यासाठी एखादे पाक्षिक व साप्ताहिक आपल्या हाती असावे असे वाटल्याने बाळासाहेबांनी अनेक आर्थिक संस्थाकडे मदत मागितली पण कोणीही पुढे येत नाही असे पाहून निराश झालेले बाळासाहेब शेवटी त्याकाळातील नामवंत वृत्तपत्र वितरक सावळाराम तथा बुवा दांगट यांना भेटले व आपला विचार त्यांना सांगितला . मराठी माणसासाठी काहीतरी चांगले होणार या कल्पनेने बुवा दांगट यांनी बाळासाहेबांची कल्पना उचलून धरली रु ५००० /- दिले आणि त्यातूनच मार्मिकचा जन्म झाला . त्याच मार्मिकच्या जीवावर शिवसेना राज्यभर पोहोचली व आज शिवसेना राज्यात आपली पाळेमुळे घट्ट रोऊन उभी आहे . त्याचे बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकेच श्रेय ज्या बुवा दांगट यांना आहे त्यांचे सुपुत्र आहेत बाजीराव दांगट .
सुरूवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांमध्ये दांगट कुटुंब अग्रस्थानी होते . अडचणीच्या वेळी दांगट यांनी त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे , स्नेहाचे संबंध निर्माण झाले होते . ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले त्यावेळी काही दिवस बाळासाहेबांनी दांगट यांच्या कुटुंबात आश्रय घेऊन पोलिस यंत्रणेला चकमा दिला होता . त्यामुळे त्यामुळे स्व. बाळासाहेब ,मीनाताई (मासाहेब) राज , उद्धव यांच्याबरोबर घरोब्याचे संबंध निर्माण झाले झाले होते . त्यामुळेच त्या बाजीराव दांगट यांना ठाकरे कुटुंबीय आपल्या घरातील समजत असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद न देणाऱ्या राज यांनी तत्काळ प्रतिसाद दिला . पण दुर्दैव आडवे आले आणि उद्धव यांना घेरलेल्या बडव्यांनी दांगट यांच्या प्रयासाला अपयश आणले कि काय ? असा प्रश्न आता साहजिकच निर्माण होवू पाहतो आहे .
नावाप्रमाणेच बाजीराव …. बाजीराव आहेत
दांगट न्यूज पेपर अजेन्सी चे सर्वोसर्वा बाजीराव दांगट यांनी मनात आणले तर त्यांना कोणत्याही राजकीय पक्षात सहज संधी मिळाली असती कारण त्यांचे अनेक राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याशी अगदी घानिष्ठ संबंध आहेत .कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ,भाजपा , मनसे या सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्याशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ८०-९० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना निवडणुकीत कुठूनही उभे राहणाची ऑफर दिली होती पण ती त्यांनी नम्रपणे नाकारत आपले बंधू बाळासाहेब दांगट यांना जुन्नर विधानसभा निवडणुकीत संधी देऊन दोन वेळा निवडून आणले होते . आपल्या माता -पित्याप्रमाणेच दातृत्व बाजीराव यांच्या अंगी असून आमदार , खासदार बनण्याची संधी असूनही ते या क्षेत्रापासून दूर का आहेत हे न सुटणारे कोडे आहे
ठाकरे बंधूंना एकत्र आणणारे ; कोण आहेत बाजीराव दांगट ?
Date: