पुणे- कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या आणि सर्वच दृष्टीने मागास असलेल्या आदिवासी भागातील मुलांनी, भारतीय जैन संघटनेच्या मदतीने गरुड झेप घेतली आहे. सर्वसाधारण शहरी भागात राहणाऱ्या मुलांच्या बरोबरीने, आदिवासी भागातील मुलांनी शालांत परीक्षेत मोठे यश मिळविले असून, त्यांनी मिळविलेले यश, हे नक्कीच कौतुकाचा विषय ठरायला हवे.
पालघरच्या डहाणू तालुक्यातील, गंजाड गावातील वरखंड पाड्यावरचा समीर वरखंडे, याला नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेमध्ये ८९.६० टक्के इतके गुण मिळाले आहेत. त्याला गणितामध्ये ९६, मराठीमध्ये ८६ आणि शास्त्र विषयात ९४ गुण मिळाले.
सुरज भंडारी याच्यावर, तर परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर एक शस्त्रक्रिया झाली होती. पण त्याने परीक्षेला बसून ८२
टक्के गुण मिळविले. नितीन तांडेल, दीपक सुमडा, कारण कोंड्या अशी ‘भारतीय जैन संघटने’च्या ‘शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा’तील सर्वच्या सर्व ५६ मुले पहिल्याच प्रयत्नामध्ये शालांत परीक्षेत यशस्वी झाली आहेत. ८० टक्के मुलांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त, तर ४ मुलांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
या विद्यार्थ्यांचे यश यासाठी महत्त्वाचे आहे, की इयत्ता ५ विला येण्यापूर्वी त्यांची ‘भारतिय जैन संघटने’तर्फे चाचणी परीक्षा घेण्यात आली होती, तेंव्हा त्यांना गणितामध्ये १० पैकी केवळ ३-४ गुण मिळाले होते आणि आज ही मुले सर्वसामान्य मुलांशी स्पर्धा करीत, त्यांच्या बरोबरीने यशस्वी झाली आहेत. समीर वरखंडे तर विद्यालयात पहिला आला आहे. ‘भारतीय जैन संघटने’च्या दीर्घ पल्ल्याच्या कामाचे हे, आज भरभरून दिसणारे यश आहे.
‘भारतीय जैन संघटने’च्या वाघोली येथील शाळेचा यावर्षीचा दहावीचा निकाल आहे, ९९.४७ टक्के, आणि आदिवासी
भागातील सर्व ५६ मुले अतिशय चांगले गुण मिळवून पास झाले आहेत. पालघरच्या विविध पाड्यावरून सहा वर्षांपूर्वी ही मुले, ‘भारतीय जैन संघटने’च्या ‘शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा’मध्ये वसतीगृहात दाखल झाली होती. केवळ पालघरच्या आदिवासी भागातूनच नव्हे, तर मेळघाटच्या पट्ट्यातील अनेक मुले दरवर्षी या प्रकल्पामध्ये दाखल होतात आणि जीवनाच्या स्पर्धेसाठी सक्षम होउन बाहेर पडतात. मेळघाटमधील २५ मुले आता यावर्षी दहावीला गेली असून, सध्या अशी ३०० मुले इथे शिक्षण घेत आहेत.
‘भारतीय जैन संघटने(बीजेएस)ने १९९३ साली लातूर भूकंपानंतर १००० भूकंपग्रस्त अनाथ मुलांना शिक्षणासाठी
पुण्यात आणले आणि या ज्ञान यज्ञाला सुरुवात झाली. लातूर, उस्मानाबादची मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करून गेल्यानंतर, महाराष्ट्रातील ठीक-ठिकाणची अनाथ मुले आणि मेळघाट, ठाणे-पालघरमधील आदिवासी भागातील मुले या प्रकल्पात येऊ लागली आणि आता ही मुले यशस्वी होऊन परतत आहेत. केवळ शाळांत परीक्षाच नव्हे, तर नवोदय विद्यालय, राष्ट्री परज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या शालेय क्रीडा स्पर्धा अशा सर्वच ठिकाणी ही मुले चमकताना दिसतात. ‘पुनर्वसन प्रकल्पा’चे व्यवस्थापक सुरेश साळुंखे म्हणाले, “आम्ही या मुलांना त्यांच्या पाड्यावर जाऊन निवडतो. त्यांची पूर्व परीक्षा घेतो. आरोग्य चाचणी घेतो. त्यातून मुले निवडतो आणि त्यांचा ५ वी ते १२वी पर्यंतचा राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा सगळा खर्च करून, या मुलांना उभे करण्याचा प्रयत्न करतो. मुलांना दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही आम्हीच आमच्या खर्चाने त्यांच्या घरी नेतो आणि आणतो. शाळेबरोबरच, वसतिगृहामध्ये विषयांचे अधिक वर्ग घेतो. खेळ, संगीत अशा विषयांमध्येही तयारी करून घेतो.”
अधीक्षक राहुक कदम यांनी सांगितले, की नियमितपणे मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यातूनच या मुलांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय फरक दिसू लागतो. खास मुलांसाठी, प्रकल्पामध्येच छोटे रुग्णालय आणि रुग्णवाहिका देखील आहे. या मुलांना जे जे आवश्यक आहे, ते सगळे देण्याकडे संस्थेचा भर आहे.
लातूर, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि आता नेपाळ, ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली, त्या त्या ठिकाणी ‘भारतीय जैन संघटने’चे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था गेले आणि त्यांनी तिथे मदतीचे नियोजन केले आणि त्यानंतर तिथल्या मुलांना पुण्यात आणून त्यांचे पुनर्वसन केले. आता याचप्रकारचे काम ते आणि त्यांचे सहकारी आदिवासी भागासाठी करीत आहेत. ते म्हणाले, “एखाद्या मोठ्या प्रश्नावर काम करायचे असल्यास, त्यावर दीर्घकालीन काम केल्याशिवाय, परिणाम दिसत नाहीत. आदिवासी भागामध्ये बदल करायचे असतील, तर त्या त्या भागातील मुले तयार झाली पाहिजेत. त्यांच्यासाठी त्यांचा लहानपणापासूनच अनेकवर्षे काम करावे लागेल. मग हीच मुले त्या त्या भागामध्ये ‘बदलाचे दूत’ म्हणून काम करतील. आम्ही मुलांना केवळ शिक्षण देतो असे नाही, तर अभ्यासेतर उपक्रमांसह सर्व प्रकारची आव्हाने पेलण्याची ताकद आणि संस्कार व मूल्यं देतो, त्यातूनच असे आश्चर्य वाटावे असे परिणाम दिसतात.” शांतीलाल मुथ्था म्हणाले, की असे प्रकल्प उभे राहू शकतात, याचे उदाहरण आम्ही उभे केले आहे. शासनाने मनावर घेतल्यास, असे अनेक प्रकल्प उभे राहतील.
आदिवासी भागातील मुलांची गरुड झेप ‘भारतीय जैन संघटने’च्या विद्यालयाचा निकाल १०० टक्के
Date: