पुणे, दि. ९ मार्च: “ स्त्रियांकडून स्वतःच्या आहाराकडे होणार्या दुर्लक्षामुळे देशातील विविध वयोगटातील महिलांची हाडे ठिसूळ आहे. याचे प्रमाण साधारणपणे ३६ ते ७१ टक्के इतके आहे. त्यामुळे त्यांनी आहाराकडे लक्ष द्यावे ” असा सल्ला मायमर वैद्यकीय महाविद्यायाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी दिला.
जागतिक महिला दिनानिमित्त एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूगणालय येथे ३५ वर्षा वयावरील महिलांसाठी हाडांचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
शिबिरात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, इत्यादी महागड्या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. ज्याचा लाभ १७१ महिलांनी घेतला. तसेच, अस्थीरोग तज्ञांनी आरोग्य मार्गदर्शन, औषधे व भौतिकोपचार तज्ञांनी महिलांसाठी उपयुक्त व्यायामाबाबात मार्गदर्शन केले.
डॉ. सुचित्रा नागरे म्हणाल्या, “ अतिशय महाग म्हणून या तपासण्या करणे सर्वसामान्य स्त्रियांना शक्य होत नाही व पर्यायी स्त्रियांमध्येे हाडांची ठिसुळता, अंगदुखी, कंबरदुखी व त्यायोगे अस्थीभंग अशा व्याधीचे प्रमाण वाढत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित मोफत शिबीरास महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला.”
शिबिराच्या यशस्वी केल्याबद्दल वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास व कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास यांनी सहभागी सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
शिबिराला यशस्वी करण्यासाठी डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. शिल्पा यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुप्ता व रूग्णालय अधीक्षक डॉ. प्रशांत कामत उपस्थित होते.