काय ते नेते ? काय ती सुरक्षा ? अन काय ती पत्रकार परिषद ? जरा पहा फोटू …. कॅमेरे आणि माईक पासून किती दूरवर उभे बंडखोरांचे नेते …अरारा …
एकनाथ शिंदें म्हणाले, “की आम्ही लवकरच मुंबईला परतणार आहोत. आमच्या गटातील जे लोक उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आहेत असा जो उल्लेख वारंवार केला जातो, त्या आमदारांची नावे जाहीर करावीत. लोकांची दिशाभूल करू नये.” आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट शिवसेना नेतृत्वाला आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले. आमचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देतील असेही त्यांनी म्हटले. आज हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात हॉटेलचे बंद गेट होते गेटच्या आतून त्यांनी या माध्यम प्रतिनिधींशी कडेकोट सुरक्षेत संवाद साधला . माध्यमांचे माईक प्रतिनिधींनी गेट च्या फटीतून हात आत घालून पुढे केले पण त्यांच्या पासून प्रचंड दूर वर असल्याने शिंदेंना ओरडावे लागत होते .
मागील आठवड्यांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन मध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, इथं आलेले 50 आमदारा स्वखुशीने आले आहेत. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्याचा दावा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेतृत्वाकडून गुवाहाटीमध्ये शिंदे यांच्या गटातील 20-21 आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे आमदार मुंबईत आल्यानंतर पक्षात सहभागी होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले. कोणताही आमदार बाहेरच्यांशी संपर्कात नसल्याचा दावा त्यांनी केला.