परिमंडळ १ पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांची उपस्थिती
पुणे : गणेशोत्सवासह विविध कार्यक्रमात शांताबाई या गाण्यावर लाखो नागरिक थिरकतात. मात्र, हे गाणे साकारलेल्या संजय लोंढे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर आज काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने देखील या लोककलाकाराकडे पाठ फिरविली आहे. आपले कुटुंब चालविण्याची भ्रांत असतानाच लोंढे यांच्या मदतीला पुण्यातील गणेशोत्सव मंडळ व ढोल-ताशा पथकाचे कार्यकर्ते धावून गेले. त्यावेळी लोंढे कुटुंबियांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ कृत विघ्नहर्ता वाद्य पथकाने नाना पेठेतील राजेवाडी परिसरात राहणा-या शांताबाई फेम संजय लोंढे यांच्या कुटुंबाला धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. यावेळी परिमंडळ १ पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष सागर कुलकर्णी, विराज मोहिते, प्रज्वल निगडे, माऊली विधाते, सिद्धार्थ पडवळ, सुजित पवार, विद्या मोहिते, शुभंकर काकडे, प्रथमेश विलासागर, मयंक ठक्कर, वैष्णवी चव्हाण, तेजश्री सुमंत, कनिष्का गायकवाड, साहिल खंडागळे, अंकुश गुप्ता, विघ्नेश दळवी, अथर्व लोंढे, गौरव दिवेकर आदी उपस्थित होते. यावेळी ढोल-ताशा वादन करुन घरासमोर रंगावली काढत आकाशकंदील व दिवे देखील कार्यकर्त्यांनी लावले.
डॉ.प्रियंका नारनवरे म्हणाल्या, लोककलाकार आणि खेळाडू यांचे देशासाठी मोठे योगदान असते. त्यांच्यामध्ये खूप कलात्मकता असते. त्यांना ही परमेश्वराची मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. आज दुर्देवाने अनेक कलाकार उपेक्षित आहेत. त्यांचे कार्य व आजची परिस्थिती ही लोकांपर्यंत पोहोचायला हवी, असेही त्यांनी सांगितले. गणेश मंडळे व ढोल-ताशा पथकातर्फे असे लोकाभिमुख कार्य व्हायला हवे, असे चंद्रशेखर दैठणकर यांनी सांगितले.
संजय लोंढे म्हणाले, अनेक महिन्यांपासून रेकॉर्डिंग किंवा स्टेश शो चे काम आलेले नाही. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक कलाकारांवर व कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकार काम करण्यास तयार असले तरी देखील काम मिळत नाही. त्यामुळे जगावे कसे आणि कुटुंबाला कसे जगवावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाने देखील आमच्याकडे त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.