पुणे : चालू आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) कामांतील फेरबदल अंतिम टप्प्यात आले आहेत. पुढील आठवड्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कामे अंतिम करून ती जाहीर केली जाणार आहेत. कामे अंतिम करताना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी आपापसात विकासकामांसाठी निधी वाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार भाजपचे प्रभुत्त्व असलेल्या परिसरात ६० टक्के आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात ४० टक्के विकासनिधी देण्याचे ठरविण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या डीपीडीसी बैठकीनंतर यापूर्वीच्या मंजूर केलेल्या १०५८ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांची फेरतपासणी करण्याचे स्पष्ट करून पालकमंत्री पाटील यांनी कामांत फेरबदल करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार कामे अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात लगबग सुरू आहे. कामांत फेरबदल करताना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना अनुक्रमे ६० टक्के आणि ४० टक्के असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात पालकमंत्री पाटील कामे अंतिम करून ती जाहीर केली जाणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्याचा चालू आर्थिक वर्षाचा तब्बल १०५८ कोटींचा आराखडा आहे. त्यापैकी केवळ २० टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामे मंजूर करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यास आचारसंहितेमुळे डीपीसीमधील कामे थांबण्याची शक्यता असल्याने ही कामे तातडीने अंतिम करणे आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम केलेली कामे जाहीर करून तातडीने कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.