मुंबई: हवेतल्या चालणाऱ्या बसचे स्वप्न दाखवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई आयआयटीमध्ये हवेतील डबल डेकर बसची संकल्पना मांडली आहे.
“ज्या शहरात रस्ते मोठे करता येत नाहीत. जमीन अधिग्रहणाबाबत समस्या निर्माण होतात, अशा शहरांमध्ये स्कायबसचा पर्याय उपयुक्त आहे”, असे नितीन गडकरी काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. दोन टेकड्यांमध्ये धावणारी 200 प्रवासी क्षमता असणारी स्कायबस फिलिपिन्समध्ये सुरू आहे. याच धर्तीवर भारतात स्कायबस सुरू करण्याचा गडकरींचा प्लॅन आहे.
गडकरींनी मुंबईकरांना दाखवले स्वप्न
मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी हवेतली डबल डेकर बस हवी, असे स्वप्न गडकरींनी मुंबईकरांना दाखवले आहे. देशात ई-हायवे बनवण्याचा आपला प्लॅन आहे, असेही त्यांनी सांगितले.गडकरी म्हणाले की, “हवेत चालणारी डबल डेकर बस मुंबईत हवी आहे, त्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत.” पवई ते नरिमन पॉईंट हवेतून प्रवास करण्याचे स्वप्नरंजन गडकरींनी मुंबईकरांसाठी केले. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी जबरदस्त भाषण केले.
मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा वापर व्हावा. बंगळुरुत इतका ट्रॅफिक जाम आहे, इतकं प्रदूषण आहे की, मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झाले, हवेत चालणारी डबल डेकर बस, मुंबईत अशीच हवी आहे, ती बनवण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. दोनशे लोक वरच्या वर हवेतून जाणार, अशी माहिती गडकरींनी दिली.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, “पवईतून डोंगराच्या वरून निघून नरीमन पॉईंटला वरच्या वर जाणार, तुमचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल, वाहतूक व्यवस्थेत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला हवा”
दरम्यान, याआधी गडकरी यांनी पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरवरही भाष्य केले होते. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय काही महिन्यांपूर्वी दिला होता. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, असे गडकरी म्हणाले होते.