पुणे – ‘विश्व जागृती मिशन ट्रस्ट’ (व्हीजेएमटी), पुणे हा आध्यात्मिक, कल्याणकारी आणि धर्मादाय विश्वस्त निधी असून त्यांचा पिसोळीमध्ये पुण्य धाम आश्रम आहे. या ट्रस्टचे पुण्यातील सिद्धेश्र्वर महादेव मंदिर, तसेच शिवपरिवार आणि गणेश यांच्या अत्यंत सुंदर मूर्ती अभिमानास्पद बाबी आहेत.
पुण्यधाम आश्रमात दरवर्षी महाशिवरात्र आणि गणेशोत्सव हे दोन सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरे होतात. हजारो लोक या प्रसंगी प्रार्थना करुन देवतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आश्रमाला भेट देतात.
यंदाही ‘व्हीजेएमटी’तर्फे गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील संत व योद्ध्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. प्रमुख आकर्षणांमध्ये आश्रमाच्या प्रवेशद्वारालगत बसवल्या जाणाऱ्या गणेशाच्या भव्य मूर्तीजवळ उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज दालनांचा समावेश आहे.
यासंदर्भात माहिती देताना पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख मा कृष्णा कश्यप म्हणाल्या, की यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आश्रमाच्या आधुनिक सभागृहात होणारे ‘होमेज टु वॉरियर्स’ शीर्षकाचे प्रदर्शन. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वातावरण निर्माण केले जाणार असून प्रेक्षकांना त्या काळातील अस्सल कलाकृती, शस्त्रे व उपकरणे पाहायला मिळतील. हा अमूल्य संग्रह महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आहे. याखेरीज प्रदर्शनात महाराष्ट्रातील परमवीर चक्र व अशोक चक्र विजेत्यांची छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
हे प्रदर्शन येत्या ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर काळात सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत सर्वांसाठी खुले असेल. त्यासाठी कोणतेही प्रवेशमूल्य नसून ट्रस्टतर्फे भाविकांना या उत्सवात उत्साहाने सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.