नवी दिल्ली, 21 जून 2022
आयुष मंत्रालय आणि कर्नाटक सरकारने म्हैसूरू इथल्या म्हैसूर पॅलेस येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस (आयडीवाय) 2022 च्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी 15,000 हून अधिक लोकांसह म्हैसूर पॅलेस येथे सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे नेतृत्व केले. यात 200 हून अधिक विशेष शारीरिकदृष्ट्या दिव्यांग मुले, 100 अनाथ मुले, 15 तृतीयपंथी, एचआयव्ही रुग्ण आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.
म्हैसूरसारख्या भारतातील अध्यात्मिक केंद्रांद्वारे शतकानुशतके जोपासलेली योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याला दिशा देत आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आज योग हा जागतिक सहकार्याचा आधार बनत आहे आणि मानवजातीला निरामय जीवनाचा विश्वास प्रदान करत आहे, असेही ते म्हणाले. आपण पाहतो की घरातल्याघरात केला जाणारा योग आज जगभरात पसरला आहे. हे अध्यात्मिक अनुभूतीचे, नैसर्गिक आणि सामायिक मानवी जाणीवेचे चित्र आहे, विशेषत: गेल्या दोन वर्षांत अभूतपूर्व महामारीच्या काळात हे दिसून आल्याचे ते म्हणाले. “योग आता जागतिक उत्सव बनला आहे. योग हा केवळ एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळेच, यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे – मानवतेसाठी योग”, असे त्यांनी सांगितले. ही संकल्पना जागतिक पातळीवर नेल्याबद्दल त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि सर्व देशांचे आभार मानले.
पंतप्रधान म्हणाले की, आज योगाशी संबंधित अपार शक्यता लक्षात घेण्याची वेळ आली आहे. आज योगाच्या क्षेत्रात अनेक नवनवीन कल्पना घेऊन आपले युवा पुढे येत आहेत. आयुष मंत्रालयाच्या स्टार्टअप योगा चॅलेंजबद्दलही त्यांनी माहिती दिली. योगाचा प्रसार आणि विकास यामध्ये मोलाच्या योगदानासाठीच्या 2021 च्या पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
व्यक्ती, समुदाय, राष्ट्रे आणि संपूर्ण जगाचे आरोग्य आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करून जागतिक शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे असे मेळाव्याला संबोधित करताना, केंद्रीय आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल म्हणाले. योगाने जगाला एकत्र आणले आहे, जागतिक मूल्यांना नव्याने आकार दिला जात आहे आणि विविध आरोग्य सेवा प्रणाली जवळ आणल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले. आरोग्य आणि विविधता साजरी करण्यासाठी आयुष मंत्रालयाने समाजातील विविध घटकांचा समावेश करण्याकरता अनोखे कार्यक्रम आखले आहेत. मंत्रालयाने योगाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत असे सोनोवाल यांनी सांगितले.