पुणे- पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत दाखल झालेल्या फायलींचा लवकर निपटारा करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘एसओपी’ (स्टँडर्ड ऑफ फॉरमॅट) तयार केली असून,. त्यानुसार फाईल इतरत्र कोठेही न फिरवता थेट संबंधित अधिकाऱ्य़ांच्या टेबलावर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध कार्यक्रमांच्या परवानग्यासह, पोलीस कर्मचाऱ्य़ांच्या फायलींचा तीन ते चार आठवड्यांचा लागणारा कालावधी संपणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार फायलींचा वेग आता सुपरफास्ट होणार आहे.
शहरातील नागरिकांकडून विविध कार्यक्रमांसह वाहतूकीच्या संदर्भातील वेगवेगळ्या परवानगीसाठीच्या अर्ज आणि फाईल पोलीस आयुक्तालयात जमा करण्यात येतात. मात्र, विविध कारणास्तव फाईल संबंधित नसलेल्या अधिकाऱ्य़ांकडे पाठविण्यात येत होती. त्यामुळे किरकोळ परवानगीसाठी अनेकांना महिन्याभराची वाट पाहावी लागत होती. फायलींचा विनाकारण प्रवास वाढल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आता मात्र, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार फाईल क्लेअर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्य़ांकडे थेट पाठविली जाणार आहे. त्यामुळे वेळ वाचण्यास मदत होणार असून नागरिकांचे हेलफाटे वाचणार आहेत. विशेषतः गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, विविध मिरवणूका, राजकीय सभांच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तालयात दाखल केलेल्या फाईलींचा प्रवास कासवगतीने होत होता. मात्र, आता फायलींचा प्रवास थांबणार आहे. त्याशिवाय पोलीस कर्मचाऱ्य़ांच्या भविष्य निर्वाह निधी, मेडीक्लेम, सेवानिवृत्ती फंड संदर्भातील सर्व फायलींना तातडीने क्लेअर करण्यासाठी अधिकाऱ्य़ांना सूचित करण्यात आले आहे.
तीन दिवसांचा फायलींचा होणार निपटारा पोलीस आयुक्तालयात दाखल करण्यात येणारे अर्ज आणि फाईलींची तपासणी करुन तीन ते चार दिवसांत पुर्णत्वात नेली जाणार आहे. त्यासाठी फाईल थेट संबंधित अधिकाऱ्य़ांच्या टेबलवर ठेवली जाणार असून सही झाल्यानंतर तातडीने नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. विविध कामकाजासंदर्भातील फायलींचा प्रवास कमी होणार असल्यामुळे नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्य़ांनी समाधान व्यक्त केले आहे.
फायलींचा निपटारा करण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्य़ांकडे फाईल पाठविली जाणार असून तातडीने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता विविध परवानग्या सोपस्कररित्या पुर्ण होणार आहेत.