पुणे, 12 मार्च 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ऋतूजा भोसले, झील देसाई, वैदेही चौधरी या भारतीय खेळाडूंचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. तर, दुहेरीत भारताच्या रिया भाटिया व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु आणि ऋतुजा भोसले व इमिली वेबली स्मिथ या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या लौरा पिगोस्सी हिने सातव्या मानांकित भारताच्या झील देसाईचा 6-4, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. हा सामना 1तास 42 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये लौराने आक्रमक सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये झीलची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या गेममध्ये लौराने झीलची सर्व्हिस ब्रेक करत सामन्यात 3-0 अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या झीलने जोरदार कमबॅक करत लौराची चौथ्या , सहाव्या गेमला सर्व्हिस भेदली व सामन्यात बरोबरी साधली. पण लौराने आपला अनुभव व कौशल्य याचा सुरेख संगम साधत झीलची सातव्या गेमला सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील लौराने आपले वर्चस्व राखत सुरुवातीला 3-0अशी आघाडी घेतली. त्यांनंतर झीलने वरचढ खेळ करत लौराची चौथ्या गेमला सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत ही आघाडी 3-2 ने कमी केली. पण लौराने आपली आघाडी कायम ठेवत झीलची नवव्या गेमला सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून विजय मिळवला. मागील आठवड्यात झीलने दिल्ली येथील 15हजार डॉलर टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठून 13 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे देशातील टेनिसपटूंच्या क्रमवारीत तिने चौथ्या स्थानावर झेल घेतली आहे.
संघर्षपूर्ण लढतीत ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या मानांकित इमेली वेबली-स्मिथ हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैदेही चौधरीचा 2-6, 6-4, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. वैदेही हिने इमेली वेबली-स्मिथला विजयासाठी चांगलेच झुंजवले. हा सामना 2 तास 32 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये वैदेहीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सेटमध्ये तिने इमेलीची तिसऱ्या, सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र इमेलीने पुनरागमन करत वैदेहीची आठव्या, दहाव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4 असा जिंकून आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये इमेलीने वैदेहीला फारशी संधी दिली नाही व या सेटमध्ये सहाव्या व आठव्या गेममध्ये वैदेहीची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकून विजय मिळवला. युक्रेनच्या पाचव्या मानांकित मारियाना झकारल्युक हिने भारताच्या व चौथ्या मानांकित ऋतुजा भोसलेचा 7-5, 6-2 असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु हिने आठव्या मानांकित रशियाच्या इरिना क्रोमाचेव्हाचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(6) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या रिया भाटियाने रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारुच्या साथीत सौजन्या बाविशेट्टी व प्रार्थना ठोंबरे या जोडीचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(4) असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या इमिली वेबली स्मिथ यांनी स्लोव्हाकियाच्या पीए लोव्हरीक व हंगेरीच्या ऍद्रियन नेगीचा 4-6,6-4,10-7 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व(मुख्य ड्रॉ)फेरी: महिला:
लौरा पिगोस्सी(ब्राझील)(3)वि.वि.झील देसाई(भारत)(7) 6-4, 6-3;
मिरीयम बियांका बुलगारु(रोमानिया)(2)वि.वि.इरिना क्रोमाचेव्हा(रशिया)(8) 6-4, 7-6(6);
इमेली वेबली-स्मिथ(ग्रेट ब्रिटन)(6)वि.वि.वैदेही चौधरी(भारत)2-6, 6-4, 6-3;मारियाना झकारल्युक(युक्रेन)(5)वि.वि.ऋतुजा भोसले(भारत)(4)7-5, 6-2;
दुहेरी गट: उपांत्य फेरी:ऋतुजा भोसले(भारत)/इमिली वेबली स्मिथ(ग्रेट ब्रिटन)(1)वि.वि.पीए लोव्हरीक(स्लोव्हाकिया)/ऍद्रियन नेगी(हंगेरी)(4) 4-6,6-4,10-7रिया भाटिया(भारत)/मिरीयम बियांका बुलगारु(रोमानिया)(2)वि.वि. सौजन्या बाविशेट्टी(भारत)/प्रार्थना ठोंबरे(भारत)(3) 6-2, 7-6(4).