पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत इन्फोसिस संघाला विजोतोपद
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कॅपजेमिनि संघाला नमवून इन्फोसिस संघाने विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना सामनावीर शारॉन थॉमसनच्या अचूक गोलंदाजीपुढे कॅपजेमिनि संघ केवळ 18 षटकात सर्वबाद 84 धावांत गारद झाला. 84 धावांचे लक्ष इन्फोसिस संघाने केवळ 11.5 षटकात 4 गडी गमावत 88 धावांसह सहज पुर्ण केले. यात संदिप शांघाई व आशय पालकर यांनी प्रत्येकी 29 धावा करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. केवळ 13 धावांत 4 गडी बाद करणारा शारॉन थॉमसन सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या इन्फोसिस संघाला 50 हजार रूपये व करंडक तर उपविजेत्या कॅपजेमिनि संघाला 30 हजार रूपये व करंडक असे पारितोषीक देण्यात आले. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज इन्फोसिसचा प्रभज्योत मल्होत्रा व सर्वोत्कृष्ट गोलंदाज कॅपजेमिनि संघाचा दिपक कुमार यांना प्रत्येकी 5 हजार रूपये व मानचिन्ह तर मालिकावीर इन्फोसिस संघाचा आशय पालकर याला 10 हजार रूपये व मानचिन्ह अशी पारीतोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय खेळाडू व आसाम क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपुत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयडीयाज् अ सास इंडियाचे संचालक प्रशांत केएस, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज् अ सास इंडियाच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स् व स्पर्धा संचालक अश्विन पन्हाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.