पुणे- शहरातील सर्वसामान्य, गोरगरीब व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा फायदा मिळावा यासाठी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘शहरी गरीब योजना कार्ड’ काढण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना वसंत भानगिरे यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.याबाबत प्रमोद भानगिरे यांनी निवेदन दिले आहे.
प्रमोद भानगिरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत असलेल्या ‘शहरी गरीब योजना कार्ड’ काढण्याचे एकमेव कार्यालय शिवाजीनगर येथील पालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यरत आहे. या ठिकाणी पालिका हद्दीतील हजारो नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. अनेक नागरीक अथवा त्यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असतात किंवा त्यांना दाखल करावयाचे असते. मानसिक तणावात असलेल्या नागरिकांना दिवस-दिवस आपला वेळ कार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. या नागरिकांचा तणाव दूर करण्याच्या हेतूने तसेच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावा, तसेच मुख्य इमारतीमधील कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा या हेतूने पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘शहरी गरीब योजना कार्ड’ काढण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
शहरी गरीब योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुणे माहापालिकेच्या माध्यमातून मिळत असते. याच अनुषंगाने विधवा निराधार महिला, अपंग, दिव्यांग या नागरिकांसाठी दोन ऐवजी तीन लाख रुपये जास्तीची तरतुद करुन त्यांना सहकार्य करावे. या मागणीचा विचार करुन नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही व प्रशासनाचा ताण कमी व्हावा, या हेतूने येत्या 15 दिवसांच्या आत ही मागणी मान्य करावी. अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईल नुसार तीव्र आंदोलन आपल्या कार्यालयावर केले जाईल. त्यावेळी होणाऱ्या दुष्परिणामास आपले कार्यालय पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा प्रमोद भानगिरे यांनी निवेदनातून दिला आहे.