पुणे, ता. २६ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) पहिले अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सोसायटीच्या विविध घटक संस्थांमध्ये ऑनलाइन पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशालेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास शिक्षक योगेश पाटील यांचे शाहू महाराजांविषयी व्याख्यान झाले. शालाप्रमुख मनिषा मिनोचा, उपशालाप्रमुख दीपा अभ्यंकर, पर्यवेक्षिका अनिता भोसले, वर्षा कुलकर्णी, शामल भाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.
अहिल्यादेवी प्रशालेत शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शाळेच्या वार्षिक ई-नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापिका दर्शना कोकरे, पर्यवेक्षिका स्वाती मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.