छंद जोपासण्यामुळे निखळ आनंद मिळतो – गायक महेश काळे
पुणे,अभ्यासामुळे गुण मिळतात, नोकरीमुळे पैसे मिळतात, मित्रांमुळे फायदा होतो आणि छंद जोपासण्यामुळे निखळ आनंद मिळतो, तो महत्वाचा आहे कारण तुम्ही आनंदी असाल, तरच सहिष्णु असता असे मत शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) हेरिटेज कनेक्टिव्ह विभागाने आयोजित केलेल्या ‘अस्तित्व-२०१६’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन करताना श्री. काळे बोलत होते. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शाळिग‘ाम, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, प्रसिध्द व्यावसायिक सुधीर दरोडे व्यासपीठावर उपस्थित होते. दरोडे-जोग प्रॉपर्टीज या कार्यक‘माचे प्रायोजक होते.
श्री. काळे पुढे म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यक‘म हा असा दुवा आहे जो माणसाला माणूस ठेवतो. चाकोरीबध्द जीवनात अंतर्मनाशी दररोज संवाद साधला पाहिजे. अंतर्मनाने सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी केल्यास आपल्याला योग्य मार्ग समजतो. मला अभिजात संगीतात जे सापडले आहे ते सोने आहे, त्याची झळाळी जगभर पोहोचवायची आहे.’
प्राचार्य रावळ म्हणाले, ‘सांस्कृतिक पायावर अस्तित्वची उभारणी झाली आहे. गेल्या सात वर्षांत पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ती खूपच लोकप्रिय झाली आहे. या वर्षी नृत्य, संगीत, छायाचित्रण, लघुपट, गायन, कोलार्ज, स्केचिंग, मेहंदी, कथालेखन अशा नऊ विभागात होणार्या या स्पर्धेत ५० महाविद्यालयातील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.’
डॉ. राजश्री गोखले, प्रा. अनघा काळे, प्रा. वृषाली महाजन, प्रा. प्रसाद बर्वे, प्रा. संविधान सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अस्तित्व-२०१६’चे संयोजन करण्यात आले. शिवरंजनी भांडारकर व साईकृती सिंग यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन, परिचय, आभार प्रदर्शन केले.