पुणे-अभिनेता संजय दत्तची अखेर सुटका झाली आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईकडे रवाना झाला सकाळी पावणेनऊच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. त्यापूर्वी आज सकाळी त्याच्या सुटकेविरोधात निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कैद्याची वर्तणूक चांगली असल्याचा अहवाल कारागृह प्रशासनाने दिल्यास कैद्याला मुदतीआधी सोडता येते. या नियमानुसार संजय दत्तची सहा महिने आधीच सुटका करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली . संजयने कारागृहाबाहेर पडल्यानंतर गेटवर फडकत असलेल्या तिरंग्याला सलाम केला. त्याच्या सुटकेवेळी पत्नी मान्यता दत्त, दिग्दर्शक राजकुमार हिरानी उपस्थित होते. संजय दत्तने अवैध शस्त्र बाळगल्यामुळे त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा सुनावण्यापूर्वी तो दीड वर्षे तुरुंगात होता. सुरक्षेच्या कारणामुळे त्याने पुढील साडेतीन वर्षे येरवडा तुरुंगात ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार पावणेतीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. त्याच्या शिक्षेची तीन वर्षे पूर्ण होत आहेत. संजय दत्तच्या शिक्षेचा एकूण कालावधी सव्वाचार वर्षे झाला आहे. त्याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्यामुळे त्याला शिक्षेत सवलत मिळाली. त्यानुसार त्याची गुरुवारी सुटका करण्याचा आदेश असल्याची माहिती पवार यांनी दिली. दरम्यान, कर्जदार, जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीने संजय दत्त याच्या सुटकेस विरोध करून कारागृहासमोर आज सकाळी निदर्शने केली.