वैकुंठ स्मशानभुमीस घड्याळ भेट – कर्मचाऱ्यांसमवेत भोजन
पुणे- पितृपंधरवड्यात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपल्या पितरांविषयी आदर बाळगणे,त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे त्यांच्या वंशजांचे कर्तव्य असल्याचे धर्मशास्त्र सांगते.मात्र कालानुरूप यात बदल ही होत गेले आहेत आणि कालसुसंगत किंवा आपल्या मनाला योग्य वाटेल / पटेल ते कृत्य केल्याने खऱ्या अर्थाने पूर्वजांचे ऋण फेडता येईल असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीतील कर्मचाऱ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे मोठे भिंतीवरील घड्याळ भेट देण्याच्या अनौपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी एम पी ग्रुप चे चेयरमन मधुकर पाठक,उद्यम विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी,शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर,विद्युतदाहिनीतील ऑपरेटर पांडुरंग शिंदे,दत्तू लोखंडे,येथील कर्मचारी राजेश आवळे,प्रताप वाघमारे,सुनील अवघडे,अनिल आवळे,मुकेश वाघमारे,पास विभागाचे श्री सोनावणे व अन्य बिगारी /कर्मचारी उपस्थित होते.
येथील कर्मचारी पुणेकरांना त्यांच्या दुःखाच्या प्रसंगात मदत करतात,सावरतात,क्रियाकर्मास मदत करतात त्यामुळेच आपण येथील कर्मचाऱ्यांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या सुख दुःखात कायम त्यांच्या सोबत राहू असे ही श्री संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
येथील कर्मचारी जे सांगतील ते ते त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ असे श्री मधुकर पथक व श्री पांडुरंग कुलकर्णी म्हणाले.( कर्मचाऱ्यांना वेळी अवेळी मयतावरील अंत्यविधीची वेळ अचूक लिहावी लागते,त्यासाठी त्यांना मोठ्या घड्याळाची आवश्यकता होती म्हणून ही भेट देण्यात आली )
येथील कर्मचाऱ्यांसमवेत भोजनाचा आस्वाद घेऊन हा छोटेखानी घरगुती कार्यक्रम संपला.