विधायक पुणेच्या वतीने ‘सन्मान विधायकतेचा’ कार्यक्रम
पुणे : गणेशोत्सवात झुंडशाही उपयोगाची नाही विधायक ताकद गरजेची आहे. ती सगळ्यांमध्ये असते ती वाढायला हवी आणि तिचे प्रकटीकरण व्हायला हवे. सद्भावनेचे संघटन, प्रेरणा आणि पाठिंबा हा गणेशोत्सवाचा गाभा आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.
विधायक पुणे, पुना गेस्ट हाउस स्नेहमंच, चंदुकाका सराफ पेढी तर्फे ‘सन्मान विधायकतेचा’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पुना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. यावेळी पुण्यनगरीच्या गणेशोत्सवामध्ये भक्तीभावाने अनेक वर्षे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा राजेशाही थाटात सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, चंदूकाका सराफ पेढीचे सिद्धार्थ शहा, किशोर सरपोतदार, अजित कुमठेकर, शिरीष मोहिते, गिरीश पोटफोडे उपस्थित होते. शाल, श्रीफळ, मिठाई, गणपतीची प्रतिमा आणि चांदीचे कडे देऊन राजेशाही सन्मान करण्यात आला.
आजतागायत साठ वर्षांहून अधिक काळ घरोघरी जिव्हाळ्याने वर्गणी मागणारे सुरेश पवार, तीन पिढ्यांचा मूर्ती कलेचा संपन्न वारसा जपणारे अभिजीत धोंडफळे, उत्सवाची मर्दानी सुरेलता संघटित करणारे अनुप साठे, इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे आणि कोरोना काळात जनसेवा करताना अकाली मृत्यूला सामोरे गेलेले बाबा जसवंते यांचे कार्य स्मरण करून सन्मान करण्यात आला.
विजय कुवळेकर म्हणाले, मतभेद बाजूला ठेवून गणेशोत्सवातील चांगल्या गोष्टींच्या मागे उभे राहायला पाहिजे. विधायक शक्तीने एकत्र येऊन एकमेकांना मदत करायला हवी. पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये जात धर्म असे काही नव्हते. जात धर्म शोधणे ही गेल्या काही वर्षात सुरू झाले आहे. गणेशोत्सवात गणपती हे एकच सूत्र होते, असेही त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, १३० वर्षांची परंपरा असलेला पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव वर्धिष्णुवृत्ती आणि परिवर्तनशीलता या अंगभूत गुणवैशिष्ट्यामुळे काळाच्या कसोटीवर टिकून जगभर विस्तारला आहे. या उत्सवाचा भक्कम पायाभूत असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा प्रतिनिधिक सन्मान करण्यात आला. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.