पुणे :
‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ने ‘रोटरी ग्लोबल ग्रँट’ योजनेच्या रूपये 30 लाख देणगीतून साकारलेल्या ‘व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रा’चे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल सुबोध जोशी यांच्या हस्ते वीर (सासावड, ता.पुरंदर) येथे झाले. ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ या एकच पालक असलेल्या कुमारवयीन मुलांचा सांभाळ करणार्या संस्थेला हे केंद्र उभारून देण्यात आले आहे.
रविवारी झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला रोटरीचे प्रांतपाल सुबोध जोशी, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’चे अध्यक्ष प्रकाश भट, ‘ज्ञानप्रबोधिनी’चे माजी प्राचार्य विवेक पोंक्षे, ‘अस्तित्व प्रतिष्ठान’च्या अध्यक्ष गीतांजली देगावकर, माजी अध्यक्ष अतुल जोशी, ‘जिल्हा बँक’ अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, मोहन पालेशा (माजी प्रांतपाल), उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अभिनेत्री नेहा शितोळे, गणेश जाधव, संतोष वाघ आदी उपस्थित होते.
या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची इमारत देखील रोटरीने बांधून दिली आहे. यामध्ये 6 संगणक -प्रिंटर, इन्व्हर्टर, कॉटन-लेदर बॅग निर्मितीची मशिनरी, ज्यूट बॅग निर्मितीच्या मशिन, पेपर प्लेट-पत्रावळ्या-द्रोण निर्मिती मशिन, पॉटरी मशिन, 4 गायी आणि मिल्कींग मशिन, गवत कापण्याचे मशिन, सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम, सोलर स्ट्रीट लाईट अशी उपकरणे या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी दिली आहेत.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’, ‘रोटरी फाऊंडेशन’, ‘न्यूझीलंड मधील रोटरी क्लब’, ‘स्वीस री’ (हाँग काँग) यांनी या केंद्राच्या उभारणीत सहकार्य केले आहे.
‘आसपासच्या कृषीकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा विचार करून या व्यावसायिक केंद्रातून पंचक्रोशीतील तरूणांना रोजगार निर्माण होऊन लघू उद्योजक तयार व्हावेत ही या प्रकल्पामागची संकल्पना आहे’ असे प्रांतपाल सुबोध जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
संतोष वाघ आणि गीतांजली देगावकर यांनी ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले. चंद्रकांत घारमाळकर यांनी आभार मानले.