मुंबई- भाजपाने शेतकऱ्यांना फसवले आहे तर शिवसेना सत्तेत फक्त अंडी उबवत बसली असून त्यांना भूमिकाच घेता येत नाही अशी टीका शेतकरी संपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. प्रत्येक विषयावर फक्त अभ्यास करायचा असेल तर त्यांनी शाळेत जायला पाहिजे, सरकार चालवू नये असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
भाजपा सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. त्यांनी शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली आहे. तिकडे सीमेवर जवान आणि इकडे शेतकरी मरतायेत, मात्र भाजपावाले खुशाल आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. यापुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो. मात्र, जे गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले, ते शेतक-यांच्या बाबतीत होऊ नये. माझा शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांसोबत मी कायमच आहे. शेतक-यांच्या संपात अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर त्यांनी करावे, पण शेतक-यांचा प्रश्न सोडवावा. सर्वात ते महत्त्वाचं आहे, असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
भाजपाने निवडणुकीआधी घोषणा दिल्या. सत्तेत आल्यानंतर घोषणा दिल्या. आता पैसे आहेत का यांच्याकडे? असा सवाल करत जोरदार टीका केली. तसेच, सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहीत नव्हतं का? योजनांना गोंडस नावे देऊन सरकार जनतेला भुलवतंय असेही राज ठाकरे म्हणाले.